Sun, Mar 24, 2019 17:15होमपेज › Satara › वाकुर्डेच्या पाण्याकडे शेतकर्‍यांच्या नजरा

वाकुर्डेच्या पाण्याकडे शेतकर्‍यांच्या नजरा

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 10:36PMउंडाळे : वैभव पाटील 

कराड दक्षिण विभागात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून या टंचाईवर मात करण्यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडणे हा एकच पर्याय आहे. दरम्यान, थकीत वीज भरल्याशिवाय पाण्याचा एकही थेंब सोडला जाणार नाही, अशी आडमुठी भूमिका वारणा प्रकल्पाचे  अधिकार्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे वाकुर्डेचे पाणी कराड दक्षिणला मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

कराड  दक्षिण विभागात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी टंचाईची तीव्रता येवढी जाणवत नाही. पण गत आठवड्यापासून विभागात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात जाणवू लागली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत टाकणे हा मार्ग आहे, पण गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे थकीत वीज बील 10 लाख आणी 2015- 16 मधील सोडलेल्या पाण्याचे थकीत  वीज बील 22 लाख  रुपये असे 32 लाख रुपये वीज बील भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही असे वारणा प्रकल्पाचे अधिकारी  यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाकुर्डेचे पाणी कराड दक्षिणला मिळणार का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

गत वर्षी वाकुर्डेचे पाणी आणण्यासाठी जि. प. सदस्य उदयसिंह पाटील यांनी रयत अथणी शुगर कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केला होता,पण मुबलक पाणी मिळाले नाही, अशी शेतकर्‍यांची ओरड होती. 
अपेक्षित पाणीपट्टी भरली नाही, असा आरोप  शिराळा तालुक्यातील युवा नेते रणधीर नाईक यांनी केला होता. यापुढे पैसे न भरल्यास पाणी दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे गत वर्षी नेमके पैसे किती जमा झाले व भरले किती याबाबतही शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. गत वर्षी वाकुर्डे योजनेचे पाणी मिळाले नसतानाही पैसे कपात केल्याने शेतकरी नाराज आहेत.

भाजपाचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी वाकुर्डेचे पाणी सोडण्यासाठी   व  वीज बील माफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.  शिवाय मुंबईत महसूल मंत्री यांची भेट घेऊन वीज बील माफ करावेअशी विनंती केली होती. मात्र अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. 

डॉ.अतुल भोसले यांच्या निर्णयाकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. ते कृष्णा कारखाना  व जयवंत शुगर कारखान्यांच्या वतीने पैसे भरून प्रश्‍न सोडवणार  की सरकार कडून पैसे माफ करुन आणणार याची प्रतिक्षा शेतकर्‍यांना आहे. मात्र शेतीसाठी यावर्षी वाकुर्डे योजनेच्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे.