होमपेज › Satara › कोयना धरणातून विनावापर पाणी सोडले

कोयना धरणातून विनावापर पाणी सोडले

Published On: Aug 14 2018 11:29AM | Last Updated: Aug 14 2018 11:29AMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात वाढलेला पाऊस, धरणात मोठ्या प्रमाणावर होणारी पाणी आवक व संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलण्यात आले आहेत. यातून प्रतिसेकंद ८ हजार ५५२ क्युसेक व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २ हजार शंभरअसे एकूण १० हजार ६५२ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.

सध्या धरणात प्रतिसेकंद तब्बल सरासरी २७ हजार ३७० क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने मंगळवारी  दुपारनंतर पुन्हा हे दरवाजे आणखी वर उचलून प्रतिसेकंद सरासरी याहीपेक्षा ८ हजार क्युसेक जास्त असे एकूण १८ हजार सहाशे क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे कोयना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.  अनेक ठिकाणी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याने नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाने आता टीएमसीची शंभरी ओलांडली असून येथे तब्बल १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणात यापूढे केवळ ३.८७ टीएमसी इतकाच साठा सामावून घेण्याची क्षमता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे यापुढे धरणात ज्या प्रमाणात पाण्याची आवक होईल त्याच प्रमाणात पुढे पाणी सोडण्यात येण्याच्या शक्यता कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले.