Mon, Apr 22, 2019 12:16होमपेज › Satara › भरगुडे पाटलांची पळशी राज्यासाठी रोल मॉडेल : विश्‍वास नांगरे-पाटील 

भरगुडे पाटलांची पळशी राज्यासाठी रोल मॉडेल : विश्‍वास नांगरे-पाटील 

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 10:32PMखंडाळा : वार्ताहर 

गाव कसे असावे हे पळशीत आल्यावर समजते. राज्यातील  आदर्श गावांसाठी जे निकष आहेत ते भरगुडे-पाटलांच्या पळशीत आल्यावर मला दिसले. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्यानंतर नितीन भरगुडे-पाटील यांनी हा लोकसेवेचा वारसा समर्थपणे जोपासला आहे. त्यामुळे पळशी हे राज्यासाठी रोल मॉडेल ठरले आहे, असे गौरवोद‍्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी काढले. 

पळशी, ता. खंडाळा येथे माजी सभापती स्व. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांची 36 वी पुण्यतिथी व जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात  अभिनेते मकरंद अनासपुरे यांना लक्ष्मणराव भरगुडे-पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दै. ‘पुढारी’चे वृत्त संपादक हरिष पाटणे, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, पुरूषोत्तम जाधव, हृदयनाथ राणे, उपसभापती वंदना धायगुडे, आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे, प्रा. एस. वाय. पवार, विजय पवार, महादेव मस्कर, प्रदिप माने, अनुप सुर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते. 

नांगरे-पाटील म्हणाले,   गेल्या 5 वर्षात 7 हजार 560 बलात्काराची नोंद आहे. यामध्ये 35 टक्के मुली या 14 ते 18 वयोगटातील आहेत. त्यासाठी पालकांनी मुलींशी संवाद साधायला हवा. मुला, मुलींना वेळीच पंखात बळ द्यायला हवे. मात्र मोबाईल, इंटरनेट वापर मर्यादीत व्हावा, अन्यथा आजची पिढी बिघडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर करावा. आयुष्य एक रेस आहे, जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असतो. त्याकरता विशेषतः तरुणांनी रेसच्या घोड्याप्रमाणे  संघर्ष करावा. नितीन भरगुडे-पाटील गेली 11 वर्षे मी या गावात यावे यासाठी प्रयत्नशील होते हे वास्तव आहे. या खेपेला त्यांचा आग्रह मला मोडता आला नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर मला मानसिक समाधान मिळाले, असे गौरवोद‍्गारही नांगरे-पाटील यांनी काढले. 

सत्काराला उत्तर देताना मकरंद अनासपुरे म्हणाले, या पुरस्काराने माझी जवाबदारी अधिक वाढली आहे. माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ म्हणजेच नाम फाऊंडेशन असून या फाऊंडेशनचे खरे श्रेय नाना पाटेकर यांनाच द्यायला हवे. पळशी गावाने सुसंवाद ठेवल्याने विकासाची गंगा वाहत आहे. आता यापुढे लोकसहभाग असेल तर या भागातही काम उभं करू, असा विश्‍वास आहे. नाम फाऊंडेशनला माध्यमांनीच चळवळ म्हणून  उभे केले आहे. नितीन भरगुडे-पाटील हा भला माणूस आहे. त्यामुळेच मी दुसर्‍यांदा पळशीत आलो. नितीन भरगुडे-पाटील यांनी प्रास्तविक केले. पोपट कासुर्डे यांनी सूत्रसंचलन केले. मान्यवरांचे स्वागत अशुतोष भरगुडे-पाटील यांनी केले. 

दरम्यान, पुण्यतिथी निमित्त गावातून सकाळी लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली तर पंचायत समितीमध्येही किसनवीर सभागृहात पुण्यतिथी कार्यक्रम घेऊन शाळकरी मुलांना गौरवण्यात आले. 

पळशीत सुरू होणार सुसज्ज ग्रंथालय

आय.जी. विश्‍वास नांगरे पाटील यांनी गणेशोत्सव वर्गणीतून आपल्या गावात सुसज्ज ग्रंथालय सुरू केले. स्वतःसह मित्रांना वाचनाची गोडी लावून आयपीएस परीक्षेची तयारी केल्याने अनेक मित्र उच्चपदस्य अधिकारी झाल्याचे सांगितले. याचीच री ओढत नितीन भरगुडे-पाटील यांनी पळशी येथेही एक चांगले ग्रंथालय सुरू करणार असून याचे उद्घाटन विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करणार असल्याचे सांगितले. यानंतर लगेच भाजप नेते पुरूषोत्तम जाधव यांनी ग्रंथालयाला 51 हजार रूपयांची देणगी जाहीर केली. यावर नितीन बापूंनी  जाधव यांना भरीव मदत करा, 51 हजार काय देताय असे म्हणतात जाधव यांनी 1 लाख रूपये देण्याचे जाहीर केले. नितीन बापूंच्या या समयसूचकतेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

खंडाळा तालुका पहिल्यांदाच एकवटला !

तालुक्याचे लोकनेते म्हणून स्व. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांनी जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आदर्शवत काम केले. त्यांचे चिरंजीव नितीन भरगुडे-पाटील हे त्यांच्याच विचाराचा वारसा जोपासत वाटचाल करत आहेत. मध्यंतरी झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने काम सुरु केले. याची प्र्रचिती पुण्यतिथीच्या कार्यक्रमात आली. या कार्यक्रमात जेष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, आनंदराव शेळके  पाटील, रमेश धायगुडे-पाटील, पुरुषोत्तम जाधव, अनूप सूर्यवंशी, वंदनाताई धायगुडे, प्रदीप माने, बंडू ढमाळ, अनिरूद्ध गाढवे, बंडा साळुंखे, लक्ष्मी पानसरे,  बाळासाहेब धायगुडे, सचिन धायगुडे, अ‍ॅड. सुनील नेवसे, प्रवीण खताळ, एस.वाय. पवार, सुभाषराव साळुंखे, बापूराव धायगुडे यांच्यासह पहिल्या फळीतले जेष्ठ व दुसर्‍या फळीतील काही राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांचे  युवा  कार्यकर्ते व्यासपीठावर आल्याने तालुका पहिल्यांदाच एकवटला असल्याचे चित्र दिसून आले.