Mon, Aug 19, 2019 04:59होमपेज › Satara › यमुनाताईंच्या निधनाने लावणी पोरकी झाली

यमुनाताईंच्या निधनाने लावणी पोरकी झाली

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 1:37AMवाई : प्रतिनिधी

आपल्या दमदार अदाकारीने व आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या लावणी साम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने आज लावणी पोरकी झाली आहे. यमुनाबाई वाईकर यांनी अविरत कलेची साधना केली. त्या शेवटपर्यंत सुस्पष्ट व मधुर आवाजात लावण्या म्हणत. बैठकीच्या लावणीला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. बालपणापासूनच आई गिताबाई यांच्याकडून गाण्याचे, लावणी गायन व अदाकारीचे धडे गिरवले.खेडयापाडयातून लावणी गायन तसेच रात्रीचे तमाशा कार्यक्रम त्यांनी केले. वयाच्या 15 ते 16 व्या वर्षापासून स्वतःची यमुना-हिरा-तारा या नावाची संगित पार्टी काढून मुंबईत भायखळा थिएटरमध्ये तमाशाचा फड उभा केला. 

शास्त्रीय संगिताचे प्राथमिक शिक्षण के. फकिर महमदजी, मुंबई, अख्तारभाई-कोल्हापूर व बिकानेरच्या एका गुरूजीकडून मिळविले. पुढे खेडयातील भटकंती संपून शहरातील थियटरमधून त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. मधुकर नेराळे यांनी त्यांचे कार्यक्रम संपूर्ण भारतात प्रदर्शीत केले. यमुनाबाई वाईकर यांच्या शांता शेळके व वसंत बापट यांनी घेतलेल्या लावणीच्या मुलाखती दूरदर्शन व अन्य चॅनेलवर गाजल्या. मानापमान, गावबंधनसारख्या नाटकांमधून त्यांनी कामे केली.

लता लोकनाटय तमाशा मंडळ या नावाने लोकनाटयाचा तंबूचा फड त्यांनी सुरू केला. दोन ट्रक, दोन पाखी तंबू व 60 ते 65 कलाकारांचा संच संपूर्ण महाराष्ट्रात सतत 12 वर्षे तमाशाच्या माध्यमातून लोकरंजन, लोकजागृती केली. 1972-73 साली लोकनाटय बंद करावे लागले. पुन्हा यमुना-हिरा-तारा संगित पार्टी नावारुपाला आणली. 1997 मध्ये पंडित बिरजू महाराज यांच्यासमवेत पुणे येथे संगीत लावणी व कथ्थक जुगलबंधी कार्यक्रम सादर करून लावणीचे नवीन पर्व सुरू केले.

वाई या ऐतिहासिक व सांस्कृतिक गावात बालगंधर्वांचा चाहता वर्ग असल्याने वाईमधील कै. दामले, सकुंडे, कै. काका देवधर नाटय कलाकारांच्या समवेत मानापमान, गावबंधन या सारख्या नाटकांमधून कामे केली व प्रशंसा मिळविली. त्यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अनेक लावण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. आजही त्यांच्या लावण्यांची जादू आहे तशीच आहे. त्यातील तुम्ही माझे सावकार, आशूक माशूक या लावण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. पण, ही लावणीच आज यमुनाबाईंच्या निधनाने पोरकी झाली आहे...!

शरद पवारही अचंबित..!

त्यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अनेक लावण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. तुम्ही माझे सावकार, आशूक माशूक या लावण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते.  पद्मश्री मिळाल्यानंतर भेटावयास आलेले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी तुम्ही माझे सावकार.. ही लावणी खडया आवाजात गाऊन दाखवली होती. वयाच्या नव्वदीतही त्यांच्या आवाजाची लकब ऐकून पवारही अचंबीत झाले होते.