Tue, Apr 23, 2019 00:20होमपेज › Satara › खिल्ली उडवायला फारशी अक्‍कल लागत नाही : खा. उदयनराजे

खिल्ली उडवायला अक्‍कल लागत नाही : उदयनराजे

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 24 2018 1:07AMसातारा : प्रतिनिधी

तुमच्याकडे निर्विवाद 40 वर्षे सत्ता होती, त्यावेळी तुम्ही काय केले? आज चुना लावून ठो-ठो बोंबलत आहेत. त्यांच्याकडे काय चुन्याची फॅक्टरी आहे का? बोंबलायला काय जाते. निवडणुका जाहीर झाल्या की जो तो उठतो व बेंबीच्या देठापासून बोलत असतो. मात्र, परत जनतेकडे फिरकत नाहीत. खिल्ली उडवायला फारशी अक्‍कल लागत नाही, तर कामे पूणर्र् करावयास अक्‍कल लागते, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केली. 

सातारा नगरपालिकेच्या अमृत योजनेतून भुयारी गटर योजना कामाचा शुभारंभ करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल परिसरात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, बांधकाम  सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, महिला व बालकल्याण सभापती संगीता आवळे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे आदी उपस्थित होते. 

खा. उदयनराजे म्हणाले, पालिका निवडणुकीवेळी साविआने जाहीरनामा प्रसिध्द केला होता. त्या जाहीरनाम्यानुसार आम्ही वचने दिलेली होती, ती आम्ही पाळली आहेत. मात्र, इतरांच्या जाहीरनाम्यात काय वचने होती? ती किती पाळली, त्याचं आम्हाला देणे घेणं नाही. दिलेले सर्व शब्द एक वर्षात मार्गी लावले आहेत, याचे सर्व श्रेय नगरसेवक व पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना जाते. 

माझ्या  हातात जादूची कांडी असती तर सर्व एका दिवसात काम झाले असते. मात्र, विविध कामे सुरू असल्याने  7 ते 8 महिने सातारकरांना अडचणी येणार आहेत. त्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही.  वर्ल्ड हेरिटेज असणार्‍या कास पठारावर  युनोस्कोची परवानगी मिळणे खूप अवघड असते. मात्र, ही परवानगी मिळून कासच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. येणार्‍या पाण्यातून पॉवर हाऊस येथे वीजनिर्मिती  करून त्यातून शहरातील स्ट्रीट लाईटला मुबलक वीज मिळणार आहे. पोवईनाका येथे होणारी कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेप्रेरटच्या कामास सुरूवात झाली. याबाबत अनेकांनी खिल्ली उडवली. मात्र, कोण बोलतं  त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. माझी कामाशी गाठ असते. प्रत्येकाने दूरद‍ृष्टी ठेवली की जास्तीत जास्त लोकांना सुखसोयी मिळत असतात.शहरातील सर्व पुलांच्या रूंदीकरणाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. माजगावकर माळ येथील झोपडपट्टीसाठी 228 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्‍न मार्गी लागले आहेत. सातारकरांसाठी आणखी भरपूर काम करणार आहे.

सातारकरांनी विश्‍वासाने निवडून दिले आहे. त्या विश्‍वासाला कधीही तडा जावू देणार नाही. नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील. मी आजही तुमचाच आहे, भविष्यकाळात मात्र खोडसळ मित्रांनी त्रास दिला नाही तर मी तुमचाच राहणार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी प्रास्तविक केले. 

 

Tags : satara, satara news, Satara Municipal Corporation, underground Gutter Yojana, Launch,