Sun, Apr 21, 2019 04:23होमपेज › Satara › दुसर्‍याच्या पोराचे बारसे घालण्याचे उद्योग बंद करा 

दुसर्‍याच्या पोराचे बारसे घालण्याचे उद्योग बंद करा 

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:19AMखटाव : प्रतिनिधी

उरमोडीचे पाणी आणण्यासाठी मी गेली नऊ वर्षे अहोरात्र परिश्रम केले आहेत. आजपर्यंत मतदारसंघात  लागेल तेव्हा  मीच पाणी आणले आहे. या योजनेच्या कामांसाठी मी परिश्रम घेत आहे. काही चिंधीचोर आणि जत्रा आल्यावर तुकड्यावर जाणार्‍यांनी कॅनॉलच्या कामाचे गुपचूप भूमिपूजन केले. मी शड्डू ठोकून सांगतो की, माण - खटावमध्ये सरकार माझेच आहे. दुसर्‍याच्या पोरांचे बारसे घालायचे उद्योग विरोधकांनी बंद करावेत. माण आणि खटाव तालुक्यातील इंच ना इंच जमिन ओलिताखाली आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. 

उरमोडी कॅनॉल प्रकल्पाअंतर्गत माण तालुक्यातील पहिल्या पिंपरी - पळशी पोट कॅनॉलच्या कामाचा शुभारंभ करताना आ. गोरे बोलत होते. कार्यक्रमाला जेष्ठ नेते भास्करराव गुंडगे, सभापती नितीन  राजगे, माण तालुकाअध्यक्ष एम. के. भोसले, खटाव तालुकाअध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, अर्जुनतात्या काळे, जि. प. सदस्य अरुण गोरे, सोमनाथ भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे पुढे म्हणाले, माण आणि खटावच्या जनतेला 40 वर्षे फसविणार्‍यांना जनतेने त्यांची जागा दाखवून माझ्यावर सलग दोन वेळा विश्वास दाखवला. आपण गेली नऊ वर्षे रात्रंदिवस काम करत या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचे प्रयत्न करत आहे. माझ्या माणदेशी जनतेला मी बागायती आणि  ऊसाची शेती करण्याचे, कारखानदारी येण्याचे स्वप्न दाखवले होते. आज जनतेच्या आशीर्वादाने  मी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. उरमोडी योजनेचे पाणी गरज असेल तेव्हा मतदारसंघात येत आहे. आलेले पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. आज सुरु केलेल्या पोटकॅनॉलचे काम 25 दिवसांत संपवून लवकरच त्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. 

आ. गोरे म्हणाले, उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 40 वर्षे काहीच न करता सत्ता उपभोगणारे या कामाला आडवे पडत आहेत, मात्र मी जनतेच्या सहकार्याने पाणीयोजनांच्या कामांच्या आड येणारे सर्व स्पीडब्रेकर काढणार आहे. चार वर्षापूर्वी उरमोडीचे पाणी माणमध्ये आणले तेव्हा हे पाणी खरे नाही, अशी बोंबाबोंब करणारे आज त्याच पाण्याचे पूजन आणि योजनेच्या कामांचे गुपचूप भूमिपूजन करतात, हेच माझे यश आहे. उरमोडीचे पाणी म्हसवड आणि पुढे राजेवाडीलाही नेणार आहे. अनेक भावी आमदार माणमधे फिरत आहेत. काही भंपक तर पाच इंची पाईपलाईनमधून 16 गावांचा पाणीप्रश्न सोडवण्याचे नाटक करत आहेत. 

अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, अर्जुनतात्या काळे, एम. के. भोसले, गुलाबराव खाडे, हांगे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. इथल्या जनतेशी आणि विकासकामांशी काहीच संबंध नसणार्‍यांनी आमदारांवर बोलू नये. यशोदीप पतसंस्था बुडवून गोरगरिबांचे पैसे लाटणार्‍या येळगावकरांनी आमदारांबाबत बोलूच नये. ज्यांना उरमोडीची काडीमात्र माहिती नाही, या योजनेशी ज्यांचा काही संबंध नाही अशा अनिल देसाईंनी दुसर्‍यावर टिका करु नये, असे आवाहनही या वक्त्यांनी केले.