Fri, Apr 26, 2019 19:24होमपेज › Satara › खंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी लता नरूटे 

खंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी लता नरूटे 

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 10:14PMखंडाळा : वार्ताहर 

खंडाळा नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्याच सुप्रिया वळकुंदे व लता नरूटे या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. यामध्ये काँग्रेसने या दुफळीचा फायदा उठवत शहर विकास आघाडी निर्माण करून लता नरूटे यांना मदत केली. त्यामुळे नरूटे यांनी वळकुंदे यांचा 11 विरूध्द 6 असा पराभव करून नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवला. दरम्यान शहराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेणार असून शहराचा कायापालट करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नरूटे यांनी स्पष्ट केले. 

दीड वर्षापूर्वी खंडाळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीत 15 वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. नगरपंचायतीत राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. शरद दोशी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सुरू होती. नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लता नरूटे, साजिद मुल्‍ला, सुप्रिया वळकुंदे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, मुल्‍ला यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीअंतर्गतच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

जेष्ठ नेते शंकरराव गाढवे, बाजार समितीचे संचालक प्रा.भरत गाढवे, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे शैलेश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या खंडाळा शहर विकास आघाडीतून नरुटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये एक पाऊल मागे घेत, विकासाच्या मुद्यावर काँग्रेस पुढे आली. त्यामध्ये खंडाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लता नरुटे यांना बहुमान मिळाला.

खंडाळा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया दुपारी 12 वाजता पार पडली. या पदासाठी सुप्रिया वळकुंदे व लता नरूटे यांच्यात सरळ लढत होती. सभागृहात प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नरूटे यांना 11 तर वळकुंदे यांना 6  मते मिळाली. त्यामुळे मोरे यांनी लता नरूटे यांना नगराध्यक्षा म्हणून घोषित केले. या निवड प्रक्रियेत मोरे यांना प्रभारी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सहकार्य केले. तर सपोनि बबनराव येडगे यांनी बंदोबस्त ठेवला होता.