Tue, May 21, 2019 18:43होमपेज › Satara › सातारा : मनसे तालुकाध्यक्षाने शहीद जवानाची जमिन हडपली

सातारा : मनसे तालुकाध्यक्षाने शहीद जवानाची जमिन हडपली

Published On: Feb 04 2018 8:31PM | Last Updated: Feb 04 2018 8:31PMवडूज : वार्ताहर

येथील मनसे तालुकाप्रमुख दिगंबर श्रीरंग शिंगाडे याने शहीद जवान रामचंद्र गोपाळ धुरगुडे (रा. धनगरवाडी ता. वाई ) यांच्या कुटूंबियांना भारत सरकारकडून मिळालेली वडूज येथील जमिन बळकावण्याचा प्रकार घडला. भारत सरकार  व शहीद जवानाची फसवणूक व अवमान केल्याप्रकरणी संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने निवेदनाद्वारे तहसिलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, रामचंद्र गोपाळ धुरगुडे हे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना ५ डिसेंबर १९७१ रोजी शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात वीरमाता हौसाबाई गोपाळ धुरगुडे (रा. धनगरवाडी ता. वाई) व त्यांच्या कुटूंबियांना भारत सरकारने वडूज येथील शासकीय मिळकत जुना सर्वे नं. ३२० व नवीन सर्वे नं. १६९  मधील  ५ एकर जमिन उदरनिर्वाहासाठी दिली होती.  ३१ जुलै १९७५ रोजी ही जमीन हौसाबाई धुरगुडे वहिवाटत होत्या. परंतु १९७६ मध्ये त्यांचे निधन झाल्याने आणि खटाव व वाई तालुक्यामध्ये बरेच अंतर असल्याने धुरगुडे कुटूंबियांचे या जमिनीकडे लक्ष कमी झाले. याचा गैरफायदा घेऊन वडूज येथील दिगंबर श्रीरंग शिंगाडे याने वडूज तहसीलदारांसमोर ७ मार्च २०१४  रोजी  आपणच एकमेव वारस असल्याचे भासवून खोटे प्रतिज्ञापत्र केले व वडूज येथेच १५ मे २०१३  रोजी मृत झाल्याची खोटी माहिती देऊन वडूज ग्रामपंचायतीकडून बोगस दाखला मिळवला.

मृत्यूचा दाखला व प्रतिज्ञापत्र, इतर कागदपत्रे सादर करून जागेची नोंद ३१ मे २०१४ रोजी शहीद परिवाराची जमीन आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून शिंगाडे याने स्वतःचा हक्क सांगून वहिवाट सुरु ठेवली. शहीद कुटूंबाची जमीन त्याने बेकायदेशीरपणे बळकावलीच नाही तर आपण स्वतः त्यांचे एकमेव वारस असल्याचे भासवून भारत सरकार, शासकीय यंत्रणा व देशासाठी बलिदान देणार्‍या शहीद जवानाच्या कुटूंबाची घोर फसवणूक केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याची सखोल चौकशी करून मनसे खटाव तालुका प्रमुख दिगंबर श्रीरंग शिंगाडेसह दोषी यंत्रणेवर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन संरक्षण मंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा सैनिक बोर्ड आदींना माहितीसाठी दिले असून या निवेदनावर नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, सुहास गोडसे, विक्रम गोडसे आदींच्या सह्या आहेत.