Mon, May 20, 2019 22:41होमपेज › Satara › माथाडी मुलांच्या माथाडी मंडळातील नोकरीबाबत कामगारमंत्री सकारात्मक 

माथाडी मुलांच्या माथाडी मंडळातील नोकरीबाबत कामगारमंत्री सकारात्मक 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:42PM

बुकमार्क करा
ढेबेवाडी : प्रतिनिधी

माथाडी कामगार मंडळावर पूर्णवेळ चेअरमन व सचिवांची नेमणूक करा, माथाडी कामगार मंडळात माथाडींच्या पात्र मुलांना सेवेत घ्या यासह अन्य मागण्यांबाबत निश्‍चिचपणे विचार करून अंमलबजावणी करू अशी ग्वाही कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी माथाडींच्या शिष्टमंडळाला दिली.

माथाडी कामगार संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार माथाडींचे नेते सरचिटणीस आ. नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी कामगार मंत्र्याना वरील मागण्या संदर्भात एक निवेदन दिले होते. त्यानुसार माथाडी कामगार मंडळावर पूर्णवेळ चेअरमन व सचिव नसल्याने व सेवानिवृत्त कागारांच्या जागी नव्याने नियुक्त्या न झाल्याने कामगारांची कामे प्रलंबीत रहात आहेत. 

त्यामुळे नविन नियुक्त्या कराव्या, कामगार भरती करावी व त्यात माथाडींच्या मुलांना प्राधान्य द्यावे, मंडळावर माथाडी कामगारांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सल्लागार मंडळावर माथाडी संघटनेला स्थान मिळावे, आदी मागण्या केल्या होत्या. 

त्या अनुषंगाने कामगार मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत वरील प्रमाणे मागण्या व माथाडी कामगार मंडळावर कामगार संख्येच्या प्रमाणात माथाडी संघटनेला प्रतिनिधित्व देऊ असे आश्‍वासन देऊन  त्याची  एका महिन्यात अंमलबजावणी करण्याचे अभिवचन ना.निलंगेकर यांनी दिले.

बैठकीस  कामगार  मंत्रालयाचे प्रधान सचिव राजेशकुमार, सह.सचिव विधळे, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, सह.आयुक्त लाखस्वा,  विश्‍वास जाधव, कामगार बोर्डाचे अधिकारी, माथाडी संघटनेचे सरचिटणीस आ.नरेंद्र पाटील, अध्यक्ष एकनाथ जाधव,सरचिटणीस चंद्रकांत पाटील, सेक्रेटरी पोपटराव देशमुख आदींची उपस्थिती होती.