Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Satara › सातारा : राजाचे कुर्लेतील गिरीजाशंकर मंदिर

सातारा : राजाचे कुर्लेतील गिरीजाशंकर मंदिर

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 6:29PMपुसेसावळी (सातारा) : विलास आपटे 

श्रावण महिना म्हणलं तर सण उत्सव, पूजा -अर्चा, व्रत- वैकल्य,उपवास आणि विनम्र प्रार्थनांची सुरवात ...त्यात श्रावणातील सोमवार व ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणारे राजाचे कुर्ले गाव. याठिकाणी श्री गिरजाशंकराचे पुरातन मंदिर असून श्रावणी सोमवारी या ठिकाणी गर्दी होते. 

श्रावण सुरू झाला की कुर्लेकरांना वेध लागतो येणार्‍या पहिल्या सोमवारचा. राजाचे कुर्ले या गावला ज्याप्रमाणे ऐतिहासिक पार्श्‍वभूमी तशी धार्मिक पण आहे. पुरातन काळातील शेकडो वर्षांपूर्वीचे शिवकालीन श्री गिरीजा शंकर मंदिर  याठिकाणी आहे. अशी ठिकाणं खूप कमी आहेत जिथं शंकर व पार्वतीचा (गिरीजा) एकत्र निवास असतो.  असं  हे पवित्र ठिकाण. 

कुर्ले गावापासून 7 कि.मी. अंतरावर पश्‍चिमेस गिरीजाशंकरवाडी नजीक निसर्गरम्य डोंगराच्या खुशीत, हिरव्यागार परिसराने व विलोभनीय निसर्गसौंदर्याने नटलेल्या पठारावर स्वयंभू असं सत्य शिवाचं अखंड ऊर्जेचा स्रोत असणारं शिवाचे देखणं मंदिर आहे.

मुळात मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं असल्याने मंदिराचा मुख्य गाभा पूर्णपणे एकसंग काळ्या पाषाणात घडवलेला व त्यावर सुंदर असे मनाला मोहून टाकणारे कोरीव काम, मंडपाला आधार देणारे स्तंभ जणू हसतमुख होऊन येणार्‍यांचे स्वागतच करतायत. मंदिराला पूर्वीपासूनचेच दगडी मंडपातील प्रवेशद्वार आणि मंदिराचे प्रतिनिधित्व करणारी अशी मोकळ्या आकाशात अभिमानाने डोलणारी दगडी दीपमाळ जणू प्रत्येकाकडे आपुलकीच्या नजरेने पाहत आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला काळ्या पाषाणातील खोल तळे आहे. वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यातही तळ्यातील पाणी कमी न  होता गोडवा व थंडावा वाढवतो. 

मंदिरात प्रवेश करण्यासाठी एखाद्या शिपायांप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे जणू येणार्‍या जाणार्‍यांना सलाम ठोकतात. सुरवातीच्या काळात मंदिर डोंगरावर गावापासून दूर असल्याने जास्त  रहदारी नव्हती. मंदिराचा सभामंडप पूर्ण लोखंडात व पत्र्यामध्ये बांधला गेला आहे.लोकांची रहदारी हळूहळू वाढू लागली. पूर्वीची झाडाझुडपाची वाट आता पायवाट झाली. लोकांचा शिवमंदिरातील शिवपार्वती बद्दलची भक्ती व विश्‍वास वाढू लागला. त्या परिसरात येऊन लोक आपलं दुःख विसरू लागले. प्रत्येक महिन्यातील व  शिवरात्रीस रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान पूजेसाठी 400 ते 500 लोक आवर्जून उपस्थित राहतात. भक्ती भावाने पूजा करतात. काही लोक तर त्यादिवशी प्रसाद वाटपाचं पवित्र काम स्वखर्चाने करतात. 

प्रत्येक शिवरात्रीला प्रवचन, किर्तन व शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन केले जाते. दूध, दही याने शिव पार्वतीला अभिषेक केला जातो.वर्षातील चैत्र महिन्यात दही भाताचा शिव पार्वतीला गारवा चढवला जातो. महाशिवरात्री व श्रावणातील तिसर्‍या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते.चैत्र अष्टमीला शिवपार्वतीचा लग्न सोहळा व कुर्ले गावातून रात्री वरात ही मोठ्या थाटाने संपन्न होते.

गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मंदिर परिसरात अमुलाग्र बदल घडले आहेत. मंदिराची आखीव-रेखीव संरक्षण भिंत, मंदिर परिसरात दोन सभामंडप,  सर्व सुखसोईयुक्त भक्त निवासस्थान, महिला निवास स्थान व मंदिराला क-वर्ग’दर्जा लाभला आहे. या मंदिर परिसरात संपूर्ण भक्तीमय रसात रमलेले असे प.पु.शिवभक्त आबानंद महाराज होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटूंबाच्या व  गावकर्‍यांच्या मदतीने एक सुसज्ज महादेव भवन मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात बांधलं गेलं आहे. सध्या मंदिराचा परिसर हा प्रसन्न, झाडाफुलांनी बहरून टाकण्याच्या उद्देशाने मंदिर व्यवस्था समिती, गावकरी व युवा वर्ग यांच्या मदतीने वृक्षारोपण सुरू आहे.

मंदिराचा परिसर, दुरून दिसणारे जोतीबा मंदिराचे शिखर, हिरवागार शालू पांघरूण सर्वदूर पसरलेले पठार हे विलोभनीय दृश्य सर्व शिवभक्तांना व पर्यटकांना नेहमी  खुणावतेय.सातारा जिल्ह्यात सातारा पासून 50 ते 55 कि.मी अंतरावर खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले हे गाव आहे. सातारा-कोरेगावमार्गे राजाचे कुर्ले या ठिकाणी हे मंदिर पाहण्यासाठी प्रवासी पर्यटकांना जाता येईल.