Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Satara › कडक उन्हाळ्यात कृष्णा कालवा तुडुंब

कडक उन्हाळ्यात कृष्णा कालवा तुडुंब

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 11:09PMकराड : प्रतिनिधी 

सातारा, सांगली कार्यक्षेत्र असणारा कृष्णा कालवा यावर्षी कडक उन्हाळ्यातही तुडुंब भरून वाहत आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी व जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

खोडशी बंधार्‍यातून सुरू झालेला कृष्णा कालवा हा सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यातील 34 गावातून वाहात जाऊन येरळेला मिळतो. सुमारे 86 कि.मी. लांबीच्या या कॅनॉलवर शेती, शेतकर्‍यांचे जीवन व आरोग्य अवलंबून आहे. या कॅनॉलच्या पाण्यावर 6 हजार 200 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. या पार्श्‍वभूमीवर या उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी वाटपाचे नेटके नियोजन केले आहे. 

कॅनॉलच्या पाण्यासाठी या उन्हाळ्यासाठी 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आवर्तन घेण्यात आले आहे. पुढील आवर्तन 15 मे 5 जून असे आहे. एका आवर्तनात 480 द.ल.घ.  फूट पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पहिले सोडलेले पाणी कॅनॉलच्या माध्यमातून विहिरी, ओढ्यांना मिळत आहे. शिवाय कॅनॉलमधून थेट शेतीलाही मिळत आहे. हा पाणीसाठा कमी होईपर्यंत पुन्हा कॅनॉलला पाणी येत असल्याने कॅनॉलवर अवलंबून असणार्‍या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न चांगल्या पध्दतीने सुटला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी पहिल्यांदाच कॅनॉलच्या पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन झाल्याने कडक उन्हाळ्यातही कॅनॉल तुडूंब भरून वाहत आहे.

कॅनॉलला पाणी सोडण्याचे नेटके नियोजन करण्यात आले असून हे नियोजन 5 जून पर्यंतचे आहे. म्हणजे संपूर्ण मे महिना शेतकर्‍यांना कृष्णा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी व जनावरांसाठी उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. 

कृष्णा कॅनॉलच्या माध्यमातून वर्षभरात शेतीसाठी मुबलक पाणी मिळत आहे. या उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवत नाही. पाटबंधारे विभागाने पाण्याचे चांगले नियोजन केले आहे, अशी प्रतिक्रिया कुंडलचे शेतकरी श्रीकांत लाड यांनी दिली. 

Tags :  Krishna canal, tumble ,cold summer,satara news