Thu, Jun 27, 2019 10:08होमपेज › Satara › कृष्णा कारखान्याची निवडणूक महत्त्वाची

कृष्णा कारखान्याची निवडणूक महत्त्वाची

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 03 2018 11:11PMउंडाळे : प्रतिनिधी 

दोन वर्षांनी होणार्‍या रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत जे आपणाला सहकार्य करतील, त्यांनाच भविष्यात आपण सहकार्य करू, असे सूतोवाच करत डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखाना निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे.

नांदगाव (ता. कराड) येथे स्व. यशवंतराव मोहिते यांचे सहकारी स्वा. सै. स्व. दाजी पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अ‍ॅड. ए. वाय. पाटील, पै. दिलीप पाटील, माजी उपसरपंच कृष्णत थोरात, सर्जेराव शिंदे, प्रशांत थोरात, धनाजी पाटील, उदय पाटील, व्ही. टी. पाटील, पै. तानाजी चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मोहिते म्हणाले, एकेकाळी भाऊंचे विचारांनी महाराष्ट्र घडवण्यात आला. त्यामुळेच त्यांचे विचार, कार्य युवा पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. स्व. यशवंतराव मोहिते यांनी राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा जोपासली आणि अखेरपर्यंत ते या विचारांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे भाऊंच्या विचारांची शिदोरी घेऊन आपण सर्वजण पुढील काळात कार्यरत राहणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांच्या विचारानुसार आपली वाटचाल सुरू राहणार आहे. केवळ घरातील अथवा भाऊंचे नातेवाईक म्हणून ते आपले आहेत असे नाही. जे लोक भाऊंचे विचार आत्मसात करून वाटचाल करतील, तेच आपले असल्याचे सांगत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक महत्त्वाची आहे. आपल्याकडे सत्ता नाही, पैसा नाही.

त्यामुळेच भाऊंचे विचार हेच आपली संपत्ती असून या जोरावरच लोकांसमोर जाणार आहोत. या निवडणुकीसाठी कोणाचीही मदत घेत असताना मदत करणार्‍यांची हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. केवळ पाठिंबा देतो, म्हणून कोणाचाही पाठिंबा घ्यायचा का? याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्व. यशवंतराव मोहिते यांनी कारखान्याच्या उभारणीमागे शेतकर्‍यांच्या उन्नतीचा, प्रगतीचा विचार केला. तोच विचार आपण आपल्या कार्यकाळात जोपासला आणि यापुढेही याच विचाराने मार्गाक्रमण करणार असल्याची ग्वाही डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिली.  अ‍ॅड. ए. वाय. पाटील यांनीही जे भाऊंचे विचार जोपासणार्‍यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.