Fri, Mar 22, 2019 08:03होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांना न्यायाची ‘भाकर’ मिळणार?

प्रकल्पग्रस्तांना न्यायाची ‘भाकर’ मिळणार?

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 10:32PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

आपल्या न्याय हक्कासाठी तब्बल अठरा दिवसांपासून कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्त भर उन्हात अंदोलन करत आहेत. कोणाच्या मुलांच्या तर कोणाच्या नातवंडांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र आयुष्याचा पेपर सोडवायला बसलेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या परीक्षेचा निकाल साठ वर्षांनंतरही लागलेला नाही. 

अंदोलनस्थळी कोणीतरी दिलेली भाकरी काही केल्या घशाखाली उतरत नाही. स्वाभिमानाचा आवंडा गिळताना ही भाकर घशाला टोचत असली तरी जगण्यासाठी दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे आता या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्याच न्याय हक्काची भाकर  शासन देणार का हा प्रश्‍न आहे.  

26 फेब्रुवारी पासून कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील अंदोलन सुरू केले आहे. याला आता अठरा दिवस उलटून गेले तरीही शासन याबाबत ठोस भूमिका घेत नाही. 

सुरूवातीच्या काळात होळी, धुळवड ते अगदी रंगपंचमीही प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाच्या मांडवातच साजरी करावी लागली. प्रकल्पग्रस्त मंडळी कोणीतरी दिलेली भाकरी, पिठलं, चटणी, ठेचा खात होती. लोक रंगपंचमीच्या रंगात बेभान  होते त्याचवेळी आयुष्याचे रंग उडालेली हीच मंडळी कृत्रिम रंगात रंगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.  

सध्या कोण ज्वारी तर कोणी भात, नाचणी देवून या अंदोलनकर्त्यांची भूक भागवत आहे. मात्र स्वाभिमानी प्रकल्पग्रस्तांना दयेची व सहानुभूतीची न्हवे तर स्वतःच्या हक्काची भाकर हवी आहे. पण याचे भान शासन, प्रशासन व राज्यकर्ते यांना नाही हे  प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैव म्हणावे लागेल.