Thu, Jun 20, 2019 21:45होमपेज › Satara › कोयना धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलले

कोयना धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलले

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:59PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर बुधवारी काहीसा कमी झाला असला, तरी धरणाच्या पूर्वेकडील कोयना नदीच्या पाणी पात्रात ज्यादा पाणी सामावून घेण्याची क्षमता असल्याने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांवरून साडेतीन फूट उचलण्यात आले आहेत. दरवाजातून विनावापर 13,081 क्युसेक व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक असे एकूण 15,181 क्युसेक पाणी प्रतिसेकंद कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. 

धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 57,350 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. एकूण पाणीसाठा 80.45 टीएमसी झाला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 

कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेऊन मंगळवारी धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांनी वर उचलून त्यातून 5788 व कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स असे एकूण 7888 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात आले होते. तथापि मंगळवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणात प्रतिसेकंद तब्बल सरासरी 78 हजार क्युसेक्स येणार्‍या पाण्याचे प्रमाण घटून ते सरासरी 57 हजार क्युसेक्स इतके झाले. 

याशिवाय पूर्वेकडील विभागातही पावसाचा जोर ओसरल्याने नदी पात्रात जास्त पाणी सामावून घेण्याची क्षमता व महापूर येणार नाही याची दक्षता घेऊन धरणातून ज्यादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी दुपारी एक वाजता धरणाचे दरवाजे दोन फुटांवरून साडेतीन फूटावर उचलून त्यातून 13081 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 असे एकूण 15181 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदीपात्राने इशारा पातळी ओलांडली आहे. 

गेल्या चोवीस तासात पाणीसाठ्यात 2.53 टीएमसी ने तर पाणी उंचीत  3.7    फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा 80.45 टीएमसी पैकी उपयुक्त साठा 75.45 टि. एम. सि. , पाणीउंची 2141.8 फूट , जलपातळी 652.780   मीटर इतकी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासात व एक जूनपासून आत्तापर्यंत झालेला पाऊस पुढील प्रमाणे-

कोयना येथे 103 मि.मी. ( 2952 ), नवजा 121    मि. मी. ( 3005 ) तर महाबळेश्‍वर येथे 97 मि.मी. ( 2652 ) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत धरणात एकूण 56.28 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 24.55 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान कोयना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.