Mon, Jun 17, 2019 03:16



होमपेज › Satara › कोयना धरण पन्‍नास टक्केभरले

कोयना धरण पन्‍नास टक्केभरले

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:28PM



पाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात दमदार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. धरणाने पन्‍नास टक्के पाणीसाठा पूर्ण केला आहे. गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात 3.94 टीएमसीने तर पाणी उंचीत 4.6 फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता 54.78 टीएमसी पाणीसाठा झाला असून 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 50.22 टीएमसी पाण्याची अवश्यकता आहे. तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दमदार पाऊस पडत असल्याने स्थानिक नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने प्रशासनाने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणांतर्गत विभागात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याअंतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येथे सरासरी प्रतिसेकंद 33490 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात एकूण 54.78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी उपयुक्त साठा 49.78 टीएमसी झाला आहे. धरणाची पाणीउंची 2112.8 फूट, जलपातळी 643.941 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना धरणात 42.70 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.बुधवार सायंकाळी पाच ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता या गेल्या चोवीस तासातील व एक जूनपासून आत्तापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 179 मि. मी. ( 2090 ) , नवजा 175 मि. मी. ( 1945 ) तर महाबळेश्‍वर येथे 150 मि. मी. ( 1769 ) मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी हा दमदार पाऊस सुरू असल्याने त्या त्या ठिकाणी असणार्‍या छोट्या नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. छोटे फरशी पूल, साकव पाण्याखाली जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावे, घरांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे.