Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Satara › कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित

कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:17PMसातारा : प्रतिनिधी

कोयना धरणग्रस्तांनी प्रजासत्ताकदिनी आंदोलन तुर्त मागे घेतले असून मागण्यासंदर्भात दि. 15 फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक न घेतल्यास 16 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून कोयनेतून होणारा वीजपुरवठा व पाणी बंद करण्याचा इशारा  श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याबरोबर निवेदनातील मुद्यावर समाधानकारक चर्चा झाली. मात्र, विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्याबरोबर बैठक होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री परदेश दौर्‍यावरून आल्यानंतर त्यांच्यासोबत सर्व विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली. अन्यथा दि. 16 फेब्रुवारीपासून पुन्हा ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनस्थळी धरणग्रस्तांची शुक्रवारी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,अधिक्षक अभियंता विजय घोगरे, उपजिल्हाधिकारी आरती भोसले, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गाडे यांनी भेट घेवून मागण्यांवर चर्चा केली. यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांचे शासनाकडे पाठवावे लागणारे प्रस्ताव येत्या 8 दिवसात सविस्तर माहितीसह पाठवले जाणार असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. धरणग्रस्तांनी 15 दिवसाची सुट्टी घेतली असून 15 फेब्रुवारीपुर्वी बैठक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  हरिश्‍चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर, प्रकाश साळुंखे, सिताराम जंगम व चैतन्य दळवी यांनी दिला.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू

जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रेकॉर्ड  शोधून ते स्कॅन करून माहिती गोळा केली जात आहे. यामधून कोयनेचे किती धरणग्रस्त आहेत? किती लोकांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. किती जणांना बोगस जमिनी वाटप करण्यात आल्या. धरणग्रस्तांच्या कोठे वसाहती आहेत ही माहितीही समोर येणार आहे.