Sat, Feb 23, 2019 10:23होमपेज › Satara › सहा महिन्यानंतरही ९७ टीएमसी पाणी

सहा महिन्यानंतरही ९७ टीएमसी पाणी

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 10:14PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणात सहा महिन्यात केवळ 8 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. यावर्षी सुमारे दीड महिना झालेल्या परतीच्या पावसाने तारले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 9 टीएमसी जादा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.                         

कोयना धरणातील पाण्यावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची विजेची व शेतीच्या पाण्याची गरज भागवली जाते. त्याचबरोबर पूर्वेकडील कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सिंचनाची गरजही पूर्ण केली जाते. 1 जून ते 31 मे असा धरण व्यवस्थापनाचे तांत्रिक वर्ष असते. आता यापैकी सहा महिने संपले आहेत. वीज निर्मितीसाठी वर्षाला 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. आत्तापर्यंत यापैकी 24.24 टीएमसी पाणीवापर झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात येणारे पाणी 16 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरले गेले आहे. त्यामुळेच वीजेसाठी 24 टीएमसीहून अधिक पाणी वापर होऊन धरणात 97.71 टीएमसी पाणी शिल्लक आहे. 

उर्वरित सहा महिन्यांसाठी आरक्षित 43.26 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात विजेची मागणी व गरज भागवणे सहजशक्य होणार आहे. सिंचनासाठी यापूर्वी वर्षभरासाठी सरासरी 22 टीएमसी पाणी ठेवण्यात यायचे. मात्र 12 ते 15 टीएमसी पेक्षा जास्त पाणीवापर व्हायचा नाही. मात्र आता टेंभू, ताकारी प्रकल्प, सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गेल्या दोन वर्षांपासून ही मागणी 34 टीएमसीवर गेली आहे. आत्तापर्यंत येथे सिंचनासाठी 5.11 टीएमसी पाणी वापर झाला आहे. आगामी काळात अजून 29 टीएमसीची गरज लागेल. वीज निर्मितीसाठीचा उर्वरित 43.26, सिंचनासाठी 29 तर मृतसाठा 5 असा एकूण 77.26 टीएमसी पाणीसाठा वापरला गेला, तरीही 20 टीएमसीहून अधिक पाणी शिल्लक राहील. त्यामुळे धरणातील मुबलक पाणीसाठा सर्वच पातळीवर समाधानकारक ठरणारा आहे. 

कोयना धरणाची सद्यस्थिती 

पाणीसाठा : 97.71 टीएमसी 
पाणी उंची : 2157.8 फूट. 
पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती पाणीवापर : 24.24  टीएमसी 
सिंचनासाठी पाणीवापर : 5.11 टीएमसी 
धरणात एकूण पाणी आवक : 122.77 टीएमसी 
विनावापर सोडलेले पाणी : 7.06 टीएमसी