Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Satara › कोयना पर्यटनला येणार ‘अच्छे दिन’ 

कोयना पर्यटनला येणार ‘अच्छे दिन’ 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटण : प्रतिनिधी 

कोयनेसह परिसरात सुरक्षेचा बागुलबुवा करत साडेतीन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेले बोटिंग महिनाभरात सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळेच कोयना विभातील दळणवळणासह पर्यटन व्यवसायासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून कोयनेतील पर्यटनाला त्यामुळे ‘अच्छे दिन’ येण्याची आशा पल्लवीत झाली आहे.  साडेतीन वर्षापूर्वी कोयना धरण सुरक्षेचा जाणीवपूर्वक बागुलबुवा करून वर्षानुवर्षे सुरू असलेले कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील बोटिंगसह स्थानिकांच्या दळणवळाची मुख्य सोय असलेेली स्थानिक लाँच बंद करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक जनतेसह बोटिंग व्यवसाय करणार्‍यांसह पर्यटकांनी अनेकदा आवाज उठविला. मात्र या विषयाचे सोयीस्कर राजकारण झाले. तसेच प्रशासकीय व्यवस्थेतही याबाबत उदासीनताच दिसून येत होती.  

वास्तविक कोयना धरण निर्मितीनंतर ही मागील साडेतीन वर्षे वगळता येथे अखंडित लाँच चालूच होती. धरणांतर्गत गावातील दैनंदिन दळणवळण, बाजारपेठा, दूध व त्यावर पूरक शेती व्यवसायही सुरळीत चालू होते. मध्यंतरीच्या काळात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नाने येथे पर्यटन पूरक अनेक नवनवीन गोष्टी घडल्या. त्यातून मग बोटिंग हा नवा व पूरक व्यवसायाने चांगलेच बाळसे धरले. अगदी कोयना धरण, नेहरू गार्डन, ओझर्डे धबधबा, शिवसागर जलाशय, पॅगोडा व बोटींग यांचे योग्य व सकारात्मक  समिकरण झाल्याने मग अगदी वडापच्या जीपसह महागड्या गाड्यांची वर्दळ वाढली. चहाची टपरी, वडापावच्या गाड्या ते थेट चांगली हॉटेल, नवनवीन रिसॉर्टही झाली. स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसाय निर्मिती होऊन कोयना सुजलाम सुफलाम झाली होती. मात्र साडेतीन वर्षांपूर्वी याला राजकीय नजर लागली आणि मग होत्याचे नव्हते झाले आणि कोयनेला बकाल रूप आले. 

वास्तविक मुंबईसह विविध ठिकाणी बॉम्बस्फोट होऊनही ती ठिकाणी बंद ठेवली गेली नाहीत. मग 1993 साली मुंबईत एका अतीरेक्याकडे कोयना धरणाचा नकाशा सापडला, म्हणून 2014 नंतर केवळ राजकीय व सुरक्षेचा बागुलबुवा करून हे लाँच व बोटिंग बंद करणे, हे सार्वत्रिक तोट्याचे ठरले आहे. श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर व प्रकल्पग्रस्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एका महिन्यात ही लाँच चालू करण्यात येईल व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पर्यटन तसेच बोटिंगसह अन्य व्यवसायात प्राधान्य देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री दिलेला आदेश व सूचनांची तात्काळ अंमलबजावणी झाली, तर निश्‍चितच कोयनेला पुन्हा अच्छे दिन येणार आहेत.
 


  •