Wed, Nov 14, 2018 16:38



होमपेज › Satara › आ. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक

कोयना अभयारण्यग्रस्तांचे प्रश्‍न सुटणार

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:10PM

बुकमार्क करा





सातारा : प्रतिनिधी 

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्यासह शासनाच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांसोबत  सातारा-जावलीकतील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात मुंबई येथे वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक होवून  कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न तातडीने सोडवू, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  आणि आ. शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, अतिरिक्त प्रधान सचिव (वन्यजीव) एम. के. राव, मुख्य वनसंरक्षक क्लायमेट बेन, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक (कोल्हापूर) अरविंद पाटील, उपवन संरक्षक (ठाणे) राजेंद्र कदम, सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी अपर्णा भोसले, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे यांच्यासह कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, रामचंद्र कोकरे- पाटील, तानाजी जाधव, वेळेढेण सरपंच राजाराम पवार, जनार्दन माने, अंकुश कोकरे, आनंद कदम आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.   

वेळेढेण, वेळे सायळी, तळदेव, देऊर या गावातील एकूण 49 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पळसपे या ठिकाणी होणार असून तातडीने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करुन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. आडोशी, माडोशी,  कुसापूर, रवंदी, खिरखंडी    आदी  गावातील प्रकल्पग्रस्त कुटूंबातील 18 वर्षे पूर्ण खातेदारांची वयोमर्यादा 31 जुलै 2008 ऐवजी 2014 पर्यंत वाढवावी, घर बांधणीसाठी 5 लाख रुपये अनुदान मिळावे, ठाणे जिल्ह्यातील भिवडी तालुक्यातील सहागाव, एकसाळ येथे पुनर्वसन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना त्वरीत नागरी सुविधा द्याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या. 

प्रधान सचिव परदेशी यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या. प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.