होमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांचा शिमगा

कोयना प्रकल्पग्रस्तांचा शिमगा

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 10:25PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

ज्यांच्या त्याग व बलिदानातून आपल्याला प्यायला व शेतीला पाणी तर मिळालेच याशिवाय आपल्याच अंधःकारमय जीवनात त्यांच्यामुळेच प्रकाश पडला, त्याच कोयना भूमिपुत्र तथा प्रकल्पग्रस्तांना गेल्या साठ वर्षांत त्यांचा किमान न्याय व हक्क मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते कोयनानगर येथे त्यांच्या न्यायासाठी आमरण आंदोलनाला बसले आहेत. एकीकडे आपण घरोघरी होळी करत असतानाच या त्यागी भूमिपुत्रांनी स्वतःच्या संसारांची राखरांगोळी केली त्यांच्या जीवनातील हाच ‘शिमगा’ अक्षरशः कृतघ्नतेचा कळस ठरत आहे, याची किमान जाण ना सरकारला ना राज्यकर्त्यांसह विरोधी पक्षांना.

शासकीय अनावस्थेविरूद्ध पेटलेला शिमगा आता कधीही वणवा बनू शकतो. त्यामुळे जर हा वणवा पेटला तर यात सर्वकाही बेचिराख होईल, याची किमान खबरदारी घेऊन याबाबत संबंधितांना न्याय द्यावा इतकी दाहकता येथे अनुभवायला मिळत आहे.कोयना धरण निर्मिती करताना येथील भूमिपुत्रांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. त्यावेळी संबंधितांना पुनर्वसन, अन्य नागरी सुविधा, शासकीय नोकर्‍या आदी विविध अश्‍वासने शासनकर्त्यांनी दिली होती. मात्र आता याबाबींना तब्बल साठ वर्षे उलटून गेली तरीही यापैकी बहुतांशी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळाला नाही. यासाठी आजवर शेकडो आंदोलनेही झाली मात्र त्याचा कोणताही व कोणावरही परिणाम झाला नाही.

केवळ घोषणा व आश्‍वासनांव्यतिरीक्त यांच्या पदरात काहीच पडले नाही. या भूमिपुत्रांची ही अवहेलना पाहाता निश्‍चितच सर्वच पातळ्यांवर या लाजीरवाण्या गोष्टी असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील येथे आमरण उपोषण सुरू आहे. याला काही दिवस उलटून गेले मात्र तरीही जिल्हा पातळीवरील मान्यवर नेते, अधिकारी याकडे फिरकले नाहीत. दिवाळीच्या फराळांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या खाण्यासाठी पाटण तालुक्यात यायला जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळ आहे मात्र याच प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करायला याच मान्यवरांना वेळ नाही. 

तीच अवस्था तालुक्यातील लोकप्रतिनिधी अथवा विरोधी नेत्यांचीही आहे. मुख्यमंत्री येणार या भाबड्या आशेपायी ही मंडळी वाट पहात आहेत. मात्र याच मान्यवरांना नदी वाचवा यासाठी सपत्नीक व मान्यवर मंत्री वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गाणी तयार करायला वेळ आहे परंतु याच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट तर दूरच किमान मंत्रालय स्तरावर बैठका घ्यायलाही वेळ नाही हीच खरी शोकांतिका.  ‘शिमगा ’ हा येथील स्थानिकांच्या भावनांचा व श्रद्धेचा सण. मात्र त्यादिवशी या आंदोलनकर्त्यांना सुखाची पोळी नशीबात न्हवती. आंदोलनाच्या ठिकाणी मग कोणी तांदूळ दिले तर कोणी भाकरीचे पिठ या दातृत्वातूनच मग पिठलं, भाकरी खाऊन पुन्हा नव्या उगवत्या सूर्याकडं तितक्याच आशेनं बघण्याची वेळ कुणामुळे आली याचातरी किमान विचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.