Sun, Sep 23, 2018 09:53



होमपेज › Satara › कोयनानगरचा होणार पर्यटन विकास

कोयनानगरचा होणार पर्यटन विकास

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:06PM



सणबुर : वार्ताहर

कोयनानगरच्या 10 किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकरीता पर्यटन विकास आराखडयास आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीता संबधित यंत्रणेने हा आराखडा तयार करुन प्रातांधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे सादर करावा, अशा सुचना आ. शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना देवून सदरचा आराखडा हा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याच्या पर्यटन विभागाकडे मान्यतेकरीता जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करुन आराखडयातील कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी आ. शंभूराज देसाई यांनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे केली होती. आ. शंभूराज देसाई यांचे मागणीवरुन व तालिका अध्यक्ष म्हणून दिलेल्या निर्देशानुसार पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा अशा लेखी सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना दिल्या आहेत. 

हा आराखडा तयार करुन तो पर्यटन विभागाकडे सादर करणेकरीता आ. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील कोयना धरण व्यवस्थापनाच्या चेमरी याठिकाणी संबधित अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत आ. देसाई यांनी माहिती देवून अधिका-यांना सुचना केल्या. 

यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे सहाय्यक वनरंक्षक सुरेश साळुंखे, नायब तहसिलदार राजेश जाधव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,शाखा अभियंता विश्‍वास नाईक,मधूकर सुर्वे यां अधिका-यांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती  हरीष भोमकर, शैलेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याप्रसंगी आराखडयात समाविष्ठ करावयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेवून यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची सुधारणा करावयाची आहे यासंदर्भात त्यांनी अधिका-यांना सुचना केल्या.  सर्व शासकीय यंत्रणांनी मागणी करण्यात आलेल्या कामांचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रके तयार करुन ती  जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणेकरीताचा कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन संबधित अधिका-यांनी आ. शंभूराज देसाईंना यावेळी दिले.

तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित : आ. शंभूराज देसाई

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशावरुनच राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी स्वत: मला सोबत घेवून धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉटची हवाई तसेच प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी केली आहे.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या बैठकीत कोयना पर्यटन विकास आराखडयातील कामांना निधी देणे व कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना बोटींग करणेकरीता धरणाच्या सुरक्षिततेच्या मर्यादीत बोटींग स्पॉट जलाशयाशेजारी विकसित करणे हे मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय हे माझे तीन वर्षाच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे आ. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.