Tue, Jun 18, 2019 21:21होमपेज › Satara › कोयना धरण... क्षमता, चिंता आणि भीतीही

कोयना धरण... क्षमता, चिंता आणि भीतीही

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 8:34PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरण भरत नाही तोपर्यंत पावसाची चिंता, भरायला आले की त्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे पूर्वेकडील विभागातील महापुराची चिंता यामुळे हे धरण बहुतेकदा चिंतेचे कारण बनते. सध्या धरणात अपेक्षित पाणीसाठा झाल्याने यापुढे येणारे पाणी त्याचपटीत पूर्वेकडे सोडण्यात येणार आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे त्यातून विनावापर सोडण्यात येणारे महाकाय पाणी आणि पूर्वेकडील विभागातील महापुराची भीती व धरणाची सुरक्षा याबाबत सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

कोयना धरण 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे आहे. कोयना ते महाबळेश्‍वर विभागातील तापोळा या 67.5 किलो मीटर अंतरामध्ये डोंगर दर्‍यात हे पाणी विखुरलेले आहे. धरणातील निव्वळ पाणीउंची ही 280 फूट आहे.  तर सहा वक्री दरवाजांची प्रत्येकी उंची आधी पंचवीस तर नव्याने झडप टाकून ती तीस फूट करण्यात आली आहे. पाणीउंची 2133.6 फूटावर जाते त्यावेळी दरवाजांना पाणी लागते व त्यावर येणारे पाणी हे यातून विनावापर सोडण्यात येवू शकते. धरण पायथ्याला असणार्‍या वीजगृहातून वीजनिर्मिती करून एका वेळी प्रतिसेकंद केवळ 2100 क्युसेक्स इतकेच पाणी सोडता येते.

या सहा वक्री दरवाजातून ज्या पटीत तथा फुटात ते वर उचलले जातात त्या पटीत हजारो क्युसेक्स पाणी यातून सोडण्यात येते. जर हे दरवाजे पूर्ण क्षमतेने म्हणजेच एकाचवेळी तीस फुटाने वर उचलण्यात आले तर यातून प्रतिसेकंद तब्बल सुमारे अडीच लाख क्युसेक्स पाणी बाहेर पडेल. मात्र त्यावेळी पूर्वेकडील अनेक विभाग पाण्याखाली जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुदैवाने धरण निर्मितीनंतर आजवर अशी वेळ आली नाही. आत्तापर्यंत येथून सर्वाधिक म्हणजेच सोळा फुटाने दरवाजे उचलून प्रतिसेकंद जवळपास एक लाख दहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. जर येथून प्रतिसेकंद एक लाख तीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले तर अर्धे सांगली शहर पाण्याखाली जाण्याच्या शक्यताही गृहीत धरण्यात आल्या आहेत. 

धरणातून एकाच वेळी सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले तर सरासरी प्रतिसेकंद अडीच लाख क्युसेक्स पाणी पूर्वेकडे सोडता येवू शकते. तर धरण निर्मितीनंतर धरणात यापूर्वी त्याच पटीत पाण्याची प्रतिसेकंद आवकही झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जर धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यापेक्षा येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिक असेल तर? 

भलेही ते प्रमाण कितीही ज्यादा असले आणि दुर्दैवाने धरण भिंतीवरून पाणी आले किंवा भिंतीच्या वर पाच फुटांनी पाणी आले तरी त्याचा धरणाच्या भिंतीवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. कारण क्षमतेपेक्षा जास्त पाणी आवक, दाब, प्रवाह याचा मातीच्या धरणांवर दुष्परिणाम होवून ती फुटू शकतात मात्र कोयना धरण हे रबल काँक्रिट मध्ये बांधण्यात आल्याने त्याला या ज्यादा पाण्याचा अथवा भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचा दावा संबंधित अभियंत्यांनी केला आहे.