Mon, Jan 21, 2019 07:15होमपेज › Satara › विजेसह सिंचनाची चिंता मिटली 

विजेसह सिंचनाची चिंता मिटली 

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:41PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

कोयना धरण व त्यातील पाणीसाठ्याची चिंता यावर्षी जुलै महिन्यातच मिटली आहे. जुलैअखेर येथे जादा पाऊस, पाणी आवक व पाणीसाठा झाल्याने आगामी काळातील विजेसह सिंचनाचा प्रश्‍नही निकाली निघाला आहे. आत्तापर्यंत येथे तब्बल 79.12 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी 8.53 टीएमसी पाण्याचा वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर झाला, तर विनावापर 12.65 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले. जुलैअखेर येथे तब्बल 86 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. 

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांचे लक्ष लागलेल्या कोयना धरणात यावर्षी अधिक पाणीसाठा झाला आहे. जुलैच्या 17 तारखेनंतर धरणाची पाणीसाठवण क्षमता व पाणीसाठा तसेच आगामी काळातील नियोजन या पार्श्‍वभूमीवर धरणातून विनावापर व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सोडण्याची लवकर वेळ आली. आता विनावापर सोडण्यात येणारे पाणी पावसाने उघडीप दिल्याने बंद करण्यात आले आहे. पायथा वीजगृहातून 17 जुलैपासून अखंडपणे पाणी सोडून त्यातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. चालूवर्षी जूनपासून आत्तापर्यंत पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 4.39, पूर्वेकडील सिंचनासाठी 1.72, पुरकाळात 2.42 अशा एकूण 8.53 टीएमसी  पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात आली आहे. ज्यादा पाणी आवक व त्याचपटीत पाणीसाठा व वीजनिर्मितीही झाली असल्याचे समाधानकारक चित्र येथे पहायला मिळत आहे. गतवर्षी 30 जुलैनंतर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. 1 जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 3461 मि.मी., नवजा 3518 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 3091 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.