Sat, Mar 23, 2019 01:58होमपेज › Satara › कोयना बोटिंग लाल फितीत अडकणार

कोयना बोटिंग लाल फितीत अडकणार

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:51PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या व प्रश्‍नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री ते थेट प्रधान सचिव यांनी दिलेली आश्‍वासने हवेत विरली आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासह नेत्यांच्या प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कोयना जलाशयात बोटिंग सुरू करण्याचा निर्णयही लाल फितीत अडकला आहे. या पावसाळ्यात याबाबतचा निर्णय झाल्यास पर्यटन वाढून रोजगार निर्मिती होईल, या आशेवर प्रकल्पग्रस्त आहेत.  

पाटण तालुक्यातील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती पाहता येथे पर्यटनाशिवाय पर्याय नाही. भूकंप व अतिवृष्टी यामुळे औद्योगिक प्रगती होवू शकत नाही. स्थानिक रेल्वे हे केवळ दिवास्वप्नच ठरत आहे. त्यामुळे स्थानिक जनता, परिसर, व्यापारी व छोटे, मोठे व्यवसाय, रोजगार, व्यवसायनिर्मिती हे सर्व एकमेव पर्यटनावर अवलंबून आहेत. स्वाभाविकच येथे पर्यटन वाढीस  चालना मिळणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने विरोधाला विरोध आणि स्थानिक राजकारणाचा हा प्रकल्प बळी ठरला आहे. 

सध्या कोयना धरण, अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यामुळे येथे पर्यटनाला अच्छे दिन येणार असल्याची स्वप्ने आहेत. मात्र ती साकारणार कधी हाच खरा प्रश्‍न आहे. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून ज्या भूमिपुत्रांनी हे प्रकल्प साकारले त्यांच्या साठ वर्षांच्या मागण्या व प्रश्‍नाबाबत न्याय देताना राज्यकर्त्यांनी आता लेखी, तोंडी आश्‍वासनेही दिली. यात प्राधान्याने कोयना धरणातील बोटिंगचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले होते.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शंभुराज देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर आदी मान्यवरांच्या प्रयत्नानंतर अगदी मुख्यमंत्री, मंत्री व राज्याचे प्रधान सचिव यांनीही अभिवचन दिले. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. एकूणच पर्यटनाला चालना मिळाली तरच यापुढे पाटण तालुक्यातील जनतेला किमान हक्काची भाकरी मिळणार आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोयना धरणातील बोटिंग. त्यामुळे उगाचच कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा आता बंद करावा. सुरक्षेबाबत आवश्यक त्या खबरदार्‍या घेऊन येथे बोटिंग सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. बोटिंग सुरू झाले तर कोयना धरण, नेहरू गार्डन, शिवसागर जलाशय व स्थानिक पर्यटन याला चालना मिळेल शिवाय स्थानिकांना रोजगार निर्माण होईल.