Sat, Jul 20, 2019 23:48होमपेज › Satara › कोयनेतून ७१२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी

कोयनेतून ७१२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी

Published On: Feb 02 2018 1:35AM | Last Updated: Feb 02 2018 1:35AMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

गतवर्षीपेक्षा यावर्षी कोयना धरणात तब्बल 18 टी. एम. सि. पाणीसाठा जास्त शिल्लक आहे ही निश्‍चितच समाधानाची बाब आहे मात्र त्याचवेळी गतवर्षीपेक्षा जानेवारी अखेर येथे तब्बल 712 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे. मुबलक पाणीसाठा असतानाही कमी केलेल्या वीजनिर्मितीमुळे शासनाचा अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला आहे. येणार्‍या महत्त्वपूर्ण चार महिन्यांत हा महसूल भरून काढण्यासाठी प्रशासकीय सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. 

यावर्षी जानेवारी अखेर येथे तब्बल 85. 52 टी. एम. सी. पाणीसाठा शिल्लक आहे ही समाधानाची बाब आहे .मात्र गतवर्षीच्या तुलनेत याच पाण्यावर होणारी वीजनिर्मिती 712 दशलक्ष युनिट कमी झाल्याने याबाबतचे नक्की प्रशासकीय धोरण काय हे अद्यापही अस्पष्टच आहे. आत्तापर्यंत अनेक वर्षे पाणीसाठा कमी असलाकी वीजनिर्मितीला कात्री लागायची. मात्र चालूवर्षी अपेक्षा व गरजेपेक्षाही जास्त पाणी असतानाही त्याचा सकारात्मक वापर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे . 105 टी.एम.सी पाण्यापैकी वर्षभर 67.50 टि. एम. सि. पाण्यावर पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. आत्तापर्यंत आठ महिन्यात यापैकी केवळ पश्‍चिमेकडे 30.26 व पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावर 1470 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. तर गतवर्षी याच काळात जास्त पाणी वापरून 2183 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली होती. 

निश्‍चितच चालूवर्षी मध्यंतरी राज्यात अचानक कोळशाचा तुटवडा पडला विजेची प्रचंड मागणी वाढली मात्र त्याचवेळीही कोयनेतून जास्त वीजनिर्मिती करण्यात आली नाही. आता तर धरणात तब्बल 85.52 टि. एम. सि. पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी चार महिन्यांत वीजनिर्मितीचा आरक्षित 37, सिंचनासाठी 18 ते 20 टि. एम. सि. चा वापर झाला तरीही धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी शिल्लक रहाणार आहे. त्यामुळे या जास्त पाण्याचा सकारात्मक वापर होऊन एका बाजूला महसुली तोटा भरून काढताना आगामी काळात हेच पाणी ऐन पावसाळ्यात महापूराच्या माध्यमातून पूर्वेकडील गावे, शेतकर्‍यांच्या मुळावर उठू नये याचीही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त केले जात आहे.