Sun, Sep 23, 2018 15:42



होमपेज › Satara › कोतवालाचे अपहरण करून बेदम मारहाण

कोतवालाचे अपहरण करून बेदम मारहाण

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:46PM

बुकमार्क करा




सातारा : प्रतिनिधी

वाळू उपशावर कारवाई का करतो, असे म्हणून वीरकरवाडी (ता. माण) येथे वाळू माफियांनी कोतवालला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण करून सांगली जिल्ह्यात नेल्याने खळबळ उडाली. तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली असून, जखमी कोतवालावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, म्हसवड पोलिसांनी जखमीचा जबाब घेतला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कृष्णदेव दत्तात्रय गुजर (रा.राणंद, ता. माण) असे हल्ल्यात जखमी झालेल्या कोतवालाचे नाव आहे. याप्रकरणी विनोद वाघमारे, अमर कोळी, ओमकार कुलकर्णी, सागर सुळे, नितीन मेटकर व एक अनोळखी यांनी मारहाण केली असल्याचा आरोप कोतवालाने केला आहे.

याबाबत रुग्णालयातून कोतवाल कृष्णदेव गुजर यांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री तहसीलदार म्हसवड यांनी वाळू चोरीप्रकरणी पथक केल्याने त्यानुसार गुजर हे बोलेरोमधून वीरकरवाडी येथे पाहणी करत होते. वीरकरवाडी येथे चौकात आल्यानंतर त्यांना एक वाळूचा डंपर दिसला. गुजर यांनी डंपरचा पाठलाग केला असता, तो डंपर काळचौंडी येथे पलटी झाला. गुजर यांनी अपघाताच्या ठिकाणी त्यांची बोलेरो जीप लावल्यानंतर याचदरम्यान पाठीमागून एक कार आली. त्या कारमधून सुमारे सहा जण उतरले व त्यांनी गुजर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

संशयितांनी मारहाण केल्यानंतर गुजर यांना कारमध्ये घालून झरे (ता. आटपाडी, सांगली) येथे नेले. पुन्हा त्या ठिकाणी बेदम मारहाण करून घडलेल्या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देऊ नये, अशी दमबाजी केली. याचवेळी गुजर यांनी सुटका करून घेतल्यानंतर पहाटे ते म्हसवड पोलिस ठाण्यात आले. जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्यांना सातारा येथे उपचारासाठी दाखल  केले.

भाजप पदाधिकार्‍यामुळे सुटका झाली...

वाळू माफियांनी गुजर यांना बेदम मारहाण करून झरे, आटपाडी येथे नेले. त्यावेळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे कारमधून निघाले होते. काही जण एकाला मारहाण करत असल्याचे अंधारात दिसल्यानंतर पडळकर यांनी कार थांबवली. जखमी अवस्थेतील गुजर यांची अवस्था पाहून त्यांनी चौकशी केली. त्यावेळी गुजर यांनी मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी जखमीला म्हसवडमध्ये सोडले.