Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Satara › पुरस्कारासाठी खेटे मारणारे शिक्षक जातीचे नसतात

पुरस्कारासाठी खेटे मारणारे शिक्षक जातीचे नसतात

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 8:53PMकोरेगाव : प्रतिनीधी 

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आदर्श पुरस्कारासाठी वर्षभर फायली घेवून तथाकथितांच्या मागे-पुढे खेटे मारणारे शिक्षक हे त्या जातीचे नसतात. हुजरेगिरी करणार्‍या अशा शिक्षकांपेक्षा दुर्गम व ग्रामीण भागात तळमळीने काम करणार्‍या शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे, असे परखड मत साहित्यीक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्‍त केलेे. राष्ट्रीय माध्य.शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद माध्य. शिक्षण विभाग, रहिमतपूर नगरपालिकासह शहरातील सर्व शिक्षणसंस्था व म.सा.प.शाखा यांच्या वतीने रहिमतपूर येथे सुरु असलेल्या ग्रंथमहोत्सवात ते बोलत होते. व्यासपिठावर शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, प्रा. प्रदीप पाटील, बी. एन. थोरात, प्रा.अनिल बोधे आदींची प्रमुख  उपस्थिती होती.

प्रा.वैजनाथ महाजन पुढे म्हणाले, समाज व्यवस्थेमध्ये शिक्षक सदैव प्रयोगशील, उपक्रमशील असायला हवा असतो. पूर्वी शिक्षक समर्पीत भावनेने शिकवत असत. आज ती परिस्थिती अपवादानेच दिसते. समाजापुढे कोणते आदर्श आहेत, हाच यक्ष  प्रश्‍न आहे. संस्काराच्या गप्पा मारणार्‍यांना थोरा-मोठ्यांचे संस्कार आत्मसात करावेसे वाटत नाहीत. संस्कार वर्तनातून येतो. त्यासाठी स्वत: सत्वशील असावे लागते. आदर्श शिक्षक हा मोठा गोंधळ आहे. शिक्षक हा आदर्शच असतो, हे सांगायची गरज भासत नाही तर तो त्याच्या नित्य आचरणातून प्रकट होत असतो. त्यासाठी पुरस्काराच्या सर्टिफिकेटची गरज नसते, असे परखड मतही त्यांनी व्यक्‍त केले. 

यावेळी शिक्षण उपसंचालक मकरंद गवळी,  प्रा.प्रदीप पाटील, बी.एन. थोरात यांनीही आपले वस्तुनिष्ठ  मत मांडले. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष शिवराज माने, देवीदास कुल्लाळ, श्रीमती मनिषा चंदुरे, सौ चित्रलेखा माने-कदम, सुनिल माने, नंदकुमार माने-पाटील, अरुण माने, रुपेश जाधव, स्मिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रास्तविक केले.उपस्थितांचा परिचय प्रा.अनिल बोधे यांनी  करुन दिला. रब्बाना नदाफ, कल्पना भोसले यांनी सुत्रसंचलन केले. दरम्यान 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी  अध्यक्ष उत्तम कांबळे यांची प्रकट मुलाखत प्रा.अनिल बोधे व सौ सुनिताराजे पवार यांनी घेतली.