Fri, Jul 19, 2019 22:05होमपेज › Satara › मुंबईतील उपोषणासाठी सर्व सभापती जाणार

मुंबईतील उपोषणासाठी सर्व सभापती जाणार

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 11:04PM कोरेगाव : प्रतिनिधी 

पंचायत समित्यांच्या सदस्यांना हक्क व अधिकार मिळावेत या मागणीसह विविध मागण्यांसाठी येत्या बुधवारी मुंबई येथील आझाद मैदानावर होणार्‍या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती व सदस्यांनी रविवारी येथे झालेल्या नियोजन बैठकीत घेतला. कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य एकत्र आले आहेत. पंचायत समितींच्या सदस्यांना हक्क व अधिकार मिळवण्यासंदर्भात यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. अन्य जिल्ह्यांतही याबाबतची माहिती दिली गेल्याने राज्यभरातील पदाधिकारी व सदस्यांमध्ये जागृती झाली आहे.

त्यामुळे येत्या बुधवारी मुंबई येथील आझाद मैदानावर पदाधिकारी व सदस्यांचे लाक्षणिक उपोषण होणार आहे. यासंदर्भातील नियोजनासाठी सभापती जगदाळे, शालन माळी, अरुणा शिर्के, संदीप मांडवे, रमेश पाटोळे, जितेंद्र सावंत, रमेश देशमुख, संजय साळुंखे आदींसह जिल्ह्यातील सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी कोरेगाव येथे बैठक झाली.  पंचायत समित्यांच्या सदस्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध व्हावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना निमंत्रित सदस्यत्व व सदस्यांना प्रतिनिधीत्व मिळावे, विधानपरिषदेच्या निवडणुकीत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, शिक्षक व ग्रामसेवकांच्या

बदलीचे अधिकार मिळावेत, ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यातील दुरुस्तीचे अधिकार गट विकास अधिकार्‍यांना मिळावेत, सदस्यांसाठी कमीत कमी पन्नास लाखांच्या स्वनिधीची तरतूद राज्याच्याअर्थसंकल्पात करावी, सदस्यांना मानधन मिळावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे व त्यात सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन जगदाळे यांनी केले. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व आमदारांचा पाठिंबा मिळवून त्यांच्यामार्फत मागण्यांसंदर्भात विधानसभेत चर्चा घडवून आणावी, असेही या बैठकीत ठरले.  ‘सदस्य फिरले, तर संपूर्ण चक्र फिरेल’, ही जाणीव सर्व आमदारांना करुन द्यायची आहे, असे अ‍ॅड. मारुती देसाई यांनी सांगितले. यावेळी अरुणा शिर्के, संदीप मांडवे, रमेश पाटोळे, राहुल शिंदे, सुप्रिया सावंत, विद्या देवरे, रमेश देशमुख यांनीही मते मांडली. संजय साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.