Thu, Apr 25, 2019 15:33होमपेज › Satara › संरक्षक भिंत बांधल्यानंतर पुन्हा निविदा 

संरक्षक भिंत बांधल्यानंतर पुन्हा निविदा 

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:21PMकोरेगाव : प्रतिनिधी

रहिमतपूरमधील कुंभारगल्ली रस्ता सुधारणा करण्याच्या कामातील कापूरओढा येथे आरसीसी संरक्षक भिंत 2014 सालीच बांधण्यात आली असताना पुन्हा याच कामाची निविदा काढून त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. ही बाब गंभीर असून जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा उद्देश असल्याची तक्रार नगरसेवक निलेश माने व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित व्यक्ती, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रहिमतपूर कुुंभारगल्ली येथील रस्ता सुधारणा करण्याकामी कापूरओढा येथे आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यासाठी 28.75 लाख रुपयांच्या कामाची निविदा दि. 9 मे 2017 रोजी प्रसिद्ध  करण्यात आली. 19 जून 2017 रोजी विशेष सभा बोलावून सभागृहात ती मंजुरीसाठी ठेवण्यात आली. त्याला मी आक्षेप घेत संबंधित काम 2014 सालीच पूर्ण झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली. विशेष म्हणजे 27 सप्टेंबर 2017 रोजी पुन्हा सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली व त्या सभेत संरक्षक भिंत बांधणे कामास सर्वांनुमते मंजुरी असा चुकीचा ठराव लिहिण्यात आला  होता.ही बाब नगराध्यक्ष व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी स्थळ पाहणी करुन व नगरपालिका बांधकाम विभागाशी चर्चा करुन अहवाल सादर केला.

त्यामध्ये 2014 व 2015 या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले. त्याच कामाची प्रशासकीय मंजुरी 24 मार्च 2017 रोजी एका आदेशान्वये मिळाली.21 जुलै 2016 कामाचा ठराव, 24 मार्च 2017  प्रशासकीय मंजुरी व 9 मे 2017 कामाची निविदा असा उलटा क्रम या कामाबाबत दिसून येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक निलेश माने यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.  निवेदन देतेवेळी निलेश माने, अनिल गायकवाड, मुगुटराव पवार, नानासाहेब माने, सतीश भोसले आदि उपस्थित होते.
 

 

tags : Koregaon,news,RCC, wall, Tender, sanction ,Try,in Rahimatpur,