Fri, Sep 21, 2018 08:26



होमपेज › Satara › कोरेगावचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे निलंबित

कोरेगावचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे निलंबित

Published On: Feb 02 2018 1:35AM | Last Updated: Feb 01 2018 10:27PM



कोरेगाव : प्रतिनिधी

कोरेगाव पोलिस ठाण्याचे कामकाज प्रभारी अधिकारी म्हणून करत असताना कामकाजामध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी संभाजी म्हेत्रे यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी काढण्यात आले. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब चुडाप्पा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी दुपारीच पदभार घेतला आहे. 
संभाजी म्हेत्रे यांची दि. 24 जून 2017 रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात नियुक्‍ती झाली होती. त्यांनी कामकाज करत असताना कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग निर्माण झाले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत चालली होती. त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अनेकदा प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. पोलिस उपअधीक्षक कु. प्रेरणा कट्टे व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी म्हेत्रे यांच्या कामकाजातील त्रुटींवर आधारित निलंबनाचा प्रस्ताव विश्‍वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. त्या आधारे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी म्हेत्रे यांना निलंबीत करण्याचा आदेश काढला. 

संभाजी म्हेत्रे यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब चुडाप्पा यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी दुपारी पदभार स्वीकारला. चुडाप्पा यापूर्वी सातारा जिल्हा विशेष शाखेत काम पाहत होते. 1993 साली उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झालेल्या चुडाप्पा यांनी विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवा बजावली आहे. सांगली जिल्ह्यात वाहतूक शाखेचा पदभार त्यांच्याकडे होता. 

कायदा व सुव्यवस्था चोख राखणार : चुडाप्पा 

आपण जनतेचे सेवक असून, सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा सर्वात महत्वाचा विषय लोकसहभागातून मार्गी लावण्याचा मानस असल्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.