Tue, Mar 19, 2019 03:44होमपेज › Satara › ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार

ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 06 2018 12:03AMकोडोली : वार्ताहर

कोडोली येथे ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील ज्ञानदेव गणपती फडतरे (वय 65, रा. जिह, ता. सातारा) हे वृद्ध जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, दुचाकीवरील एक जण जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानदेव फडतरे व त्यांचा पुतण्या दादासो फडतरे हे दोघे कामानिमित्त सातारा येथे आले होते. सातार्‍यातील काम झाल्यानंतर दुचाकीवरून परत गावी जात असताना ते कोडोली गावच्या हद्दीत आले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच वेळी दुचाकीच्या पाठीमागून आलेल्या ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसली.

ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरून ज्ञानदेव फडतरे खाली पडले व   ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. हा अपघात एवढा भीषण होता की ज्ञानदेव फडतरे जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील वाहतूक ठप्प झाली. ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे दामटला व बाजूला ट्रक लावून तो तेथून पसार झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. जखमी दादासो फडतरे यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

फडतरे यांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडला होता. दरम्यान, शहर पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतुक पोलिसांनी सुरळीत करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.