होमपेज › Satara › महिनाभरात कारभार सुधारा अन्यथा कारवाई

महिनाभरात कारभार सुधारा अन्यथा कारवाई

Published On: Aug 19 2018 1:26AM | Last Updated: Aug 18 2018 11:38PMकोडोली : वार्ताहर

सातारा तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार अनागोंदीपणे सुरु असून कोणाचाही त्यावर अंकुश राहिला नाही. गटशिक्षणाधिकारीही कारभारातील सुधारणेकडे लक्ष देत नाहीत. विद्यार्थ्यांना सुविधा देण्याबाबत उपाययोजना करण्याची उदासिनता असल्याने सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत गटशिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागावर ताशेरे ओढण्यात आले. महिनाभरात शिक्षण विभागाचा कारभार सुधारा अन्यथा होणार्‍या कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमच भरल्याने उपस्थित अधिकारीही आवाक् झाले.

दरम्यान, शाहूपुरी प्राथमिक शाळेतील एका महिला शिक्षकेने ग्रामपंचायतच्या कचरा उचलणार्‍या ट्रॅक्टर चालकाशी शालेय विद्यार्थ्यांना धावत्या ट्रॅक्टरसमोर उभे करुन हुज्जत घातल्याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच तिच्यावर योग्य कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत सदस्यांसह पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा सदस्य संजय पाटील यांनी दिला.
सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलींद कदम यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली.
शिक्षण विभागाच्या आढाव्या-दरम्यान तालुक्यातील अनेक शाळेत शिक्षक कमी आहेत. तालुक्यातील कमी पट असलेल्या 12 शाळांमध्ये 1 ते 2 विद्यार्थ्यांसाठी दोन दोन शिक्षक आहे. तेथे एक शिक्षक  ठेवून बाकीच्या शिक्षकांचे जादा पट असलेल्या व शिक्षक कमी असलेल्या शाळेवर समायोजन करा, अनेक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शाळेवर न जाता वारंवार पंचायत समितीमध्ये दिसतात. शिक्षकांच्यावर तुमचा अंकुश नाही. शाळा वेळेत भरत नाहीत. शिक्षक उशिरा जातात. पुढच्या मिटींगला विद्यार्थी पट, शाळांची संख्या, शिक्षक संख्या त्यांच्या  नेमणुका केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या भेटी इत्यादीबाबतची सविस्तर माहिती सभागृहाला सादर करा. शिक्षणापासून मुले वंचित होवू नयेत याची खबरदारी घ्या. यापुढे शिक्षणाचा कारभार एका महिन्यात सुधारा अन्यथा आम्हा सदस्यांनाही वेगळा विचार करावा लागेल, असे जितेंद्र सावंत, अरविंद जाधव, संजय पाटील, राहुल शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी केला.

शाहूपुरी शाळेतील शिक्षकेची खातेनिहाय चौकशी व्हावी, तिच्यावर कडक कारवाई करावी, संबंधित शिक्षिकेची पाठराखण केल्यास पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह मी स्वत: धरणे आंदोलन करणार, असे संजय पाटील यांनी सांगितले.

आजच्या सभेत जीवनप्राधिकरण, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम,  जि.प. बांधकाम, आरोग्य या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत अनेक सदस्यांनी भाग घेवून आपल्या भागातील समस्या मांडल्या. 
दरम्यान, अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची वर्क ऑर्डर तातडीने काढा, अशी मागणी सदस्य आशुतोष चव्हाण यांनी केली.