Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Satara › विशाळगडाजवळ हाडे, कपडे सापडली

विशाळगडाजवळ हाडे, कपडे सापडली

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:09PMउंब्रज : प्रतिनिधी 

गायकवाडवाडी (ता. पाटण) येथील किशोर गायकवाड याच्या खूनप्रकरणी उंब्रज पोलिसांनी शुक्रवारी विशाळगड परिसरातील टेंभुर्णेवाडी येथील कोकण पॉईंटवर एका दरीतून कपडे तसेच काही मानवी हाडे ताब्यात घेतली. दरम्यान, संशयितांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे.

गायकवाड खूनप्रकरणी अटक केलेल्या सर्जेराव महाराज, सागर देसाई, राहुल शिंदे या तिन्ही संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून उंब्रजचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह हवालदार पी. सी. देशमुख, एल. एम. जगधने, एस. सी. मयेकर व अन्य सहकार्‍यांनी विशाळगड परिसरात तपास केला. आंबा ते विशाळगड जाणार्‍या रोडवर गजापूर गावचे हद्दीत टेंभुर्णेवाडी येथील कोकण पॉईंट शेजारी 60 मीटर खोल दरी आहे. या दरीत किशोर गायकवाड याचा मृतदेह टाकल्याचे त्याठिकाणी गेल्यानंतर स्पष्ट झाले. 

जवळपास आठ महिन्यांपूर्वी ही घटना घडल्याने पोलिसांना घटनास्थळी काही मानवी हाडे व इतर अवशेष कुजलेल्या स्थितीत आढळून आले. तसेच याठिकाणी गायकवाड याने घटनेदिवशी घातलेली जीन्स पॅन्ट व टी शर्ट मिळून आला आहे. हे सर्व अवषेश तपासणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती  पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी दिली आहे.