होमपेज › Satara › किसनवीरचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव

किसनवीरचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 11:37PMभुईंज : वार्ताहर

शेती, शेतीपुरक उद्योग आणि शेतकर्‍यांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किसनवीर सहकारी साखर कारखान्याला माजी केंद्रीय मंत्री व खा. शरद पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक सामाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.  स्व. वसंतराव नाईक जयंती व कृषिदिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.

किसनवीर कारखान्याने गत 15 वर्षात हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना अभिप्रेत असलेले कार्य केले आहे. कृषी आणि कृषी पूरक विकासाचे महत्वपूर्ण कार्य करताना शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उस उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचलेले आहे. शेतकर्‍यांना दिशादर्शक ठरणारे अनेक उपक्रम सुरू करण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्‍नात भर पडण्यासाठी मोठया प्रमाणात फळझाड रोपे उपलब्ध करून दिलेले आहेत. या सर्व कामांची दखल घेत वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठानच्यावतीने मानाच्या वसंतराव नाईक सामाईक पुरस्काराने किसन वीर कारखान्यास सन्मानित करण्यात आले. 

यावेळी खा. शरद पवार म्हणाले, राज्यातील चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यामध्येही त्यांचे योगदान होते. गेल्या दहा वर्षात भारत देश अन्‍नधान्य, साखर, कापूस, फळे, भाजीपाला, निर्यात करणारा देश झाला. त्याची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली होती. अन्‍नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणाच त्यांनी पुण्यात केली होती. त्याप्रमाणे आमच्यासारख्या सहकार्‍यांना कामाला लावून त्यांनी देश अन्‍नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण केला. शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर ते नेहमी अस्वस्थ व्हायचे. रोजगार हमीचा कायदा त्यांनी आणला. पुढे हा कायदा संपुर्ण देशाने स्वीकारल्याचे सांगून खा. पवार यांनी स्व. नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानची माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कल्पना साठे यांनी सूत्रसंचालन केले.  दिपक पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश नाईक, खजिनदार बकुल पटेल, सचिव अ‍ॅड. विनय पटवर्धन, विश्‍वस्त डॉ. एम. पी. इराणी, निलय नाईक, कारखान्याचे संचालक चंंद्रकातं इगंवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुखे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, मधुकर नलवडे, प्रकाश पवार, विजय चव्हाण, नवनाथ केंजळे व अधिकारी उपस्थित होते.