Thu, Jul 18, 2019 21:34होमपेज › Satara › ‘किसन वीर’ची साखर, मोलॅसिस ताब्यात

‘किसन वीर’ची साखर, मोलॅसिस ताब्यात

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 11:55PMवाई/खंडाळा : प्रतिनिधी 

साखर आयुक्‍तांनी किसन वीरची मालमत्ता विकण्याचे आदेश शनिवारी दिल्यानंतर त्या पार्श्‍वभूमीवर किसन वीरच्या खंडाळा साखर कारखान्यातील शिल्लक 2 लाख, 81 हजार क्विंटल साखरेच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला तर भुईंज येथील कारखान्यातील 5 लाख 49 हजार 215 क्‍विंटल साखर व 1 हजार 621 टन मोलॅसिस वाई पुरवठा विभागाने ताब्यात घेतले आहे. हा स्टॉक ताब्यात घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कारखाना प्रशासनाला शेतकर्‍यांची देणी भागवण्यासाठी आणखी वेळ देणार असल्याचे समजते. त्या कालावधीत बिले न मिळाल्यास याची विक्री केली जाणार आहे. 

साखर कारखान्यात उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर एफआरपीची रक्‍कम टाकणे बंधनकारक आहे. असे असतानाही किसनवीर कारखान्याने 6 महिने शेतकर्‍यांचे 98 कोटी, 74 लाख रूपये थकवले होते. याबाबत वारंवार मुदत देऊनही कारखाना प्रशासनाने शेतकर्‍यांची देणी भागवली नव्हती. शेतकर्‍यांच्या ऊस बिलाबाबत आयुक्‍तांकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी आयुक्‍तांनी आदेश काढले होते. हे आदेश काढल्यानंतर शनिवारी रात्री उशिरापर्यंत पुरवठा विभागाची कारवाई सुरू होती. 

रविवारी खंडाळा साखर कारखान्याच्या स्टॉक रजिस्टरची पाहणी तहसीलदारांनी करून पंचनामा केला. यामध्ये खंडाळा साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 2  लाख 81 हजार क्विंटल साखर असल्याची माहिती तहसिलदार विवेक जाधव यांनी दिली. याबाबतचा अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. सध्या ही साखर राज्य सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात आहे. 

दरम्यान, भुईंज येथील कारखान्यातील साखर व मोलॅसिसच्या स्टॉकबाबतची माहिती वाई पुरवठा विभागाने घेतली. याबाबतची सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना दिली होती. त्यानुसार आता ऊस उत्पादक शेतकर्‍यांची देणी दिली जाणार नाहीत तोपर्यंत कारखाना प्रशासनाने सदर स्टॉकमधील कोणताही माल जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेशिवाय विकू नये, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता किसनवीर कारखान्याचा भुईंज व खंडाळा येथील साखर व मोलॅसिसचा स्टॉक जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यातच राहणार आहे. 

वाई पुरवठा विभाग, तहसीलदार अतुल म्हेत्रे, नायब तहसीलदार राऊत यांनी पोलीस यंत्रणेच्या मदतीने कारखान्यातील 5 लाख 49 हजार 215 क्विंटल साखर व 1621 मे. टन मोलॅसिस ताब्यात घेतले आहे. साखर व मोलॅसिस ताब्यात घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कारखान्याला एक डेडलाईन देतील. या मुदतीत शेतकर्‍यांची देणी न दिल्यास साखर व मोलॅसिसची विक्री करण्यात येईल. पुढील कार्यवाही व शेतकर्‍यांचे पैसे मिळण्यासाठी आ. मकरंद पाटील शेतकर्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडणार आहेत. वास्तविक यापूर्वी या स्टॉकवर काही बँकांचे कर्ज असल्याने शेतकर्‍यांची देणी कशी भागणार? याबाबत आता संबंधित शेतकर्‍यांत चर्चा सुरु आहे.