Thu, Apr 25, 2019 13:38होमपेज › Satara › शाळकरी मुलाचे वारुंजीतून अपहरण

शाळकरी मुलाचे वारुंजीतून अपहरण

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:07PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

घराजवळ खेळत असलेल्या शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची घटना कराड तालुक्यातील वारुंजी येथे घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुजल लाला लोखंडे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.  

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुजल हा केसे (ता. कराड) येथील मराठी शाळेत इयत्ता 6 वीमध्ये शिक्षण घेत आहे. अनेकवेळा तो शाळा बुडवून खेळत असे. सुजल हा शाळेत जात नसल्याने बर्‍याचवेळा वडील लाला लोखंडे त्याला रागवत होते. रविवार दि. 17 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास  लाला लोखंडे व सुजलची आई सविता कामाला गेले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लाला घरी आले असता सुजल घरासमोर खेळत होता.

त्यामुळे सारखा कशाला खेळतो, अभ्यास करत बस असे सुजलला सांगून लाला यांनी घरात जाऊन पाणी भरण्यास सुरूवात केली. पाणी भरून झाल्यानंतर लाला यांनी मुलाला हाक मारली, त्यावेळी सुजल तेथे नव्हता. त्यास आजुबाजुला शोधले परंतु, तो कोठेच दिसला नाही. त्यानंतर पुणे, पिलीव, वारुंजी, कराड यासह घराच्या परिसरात शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्याला कोणीतरी अज्ञात कारणास्तव फुस लावून कोठेतरी पळवून नेले असल्याबाबतची फिर्याद लाला लोखंडे यांनी शहर पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.