Sat, Jun 06, 2020 19:54होमपेज › Satara › रामराजे-उदयनराजे एकाचवेळी विश्रामधामावर आल्याने तणाव

रामराजे-उदयनराजे एकाचवेळी विश्रामधामावर आल्याने तणाव

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 10:13PMसातारा : प्रतिनिधी

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यातील खुन्‍नस रविवारी पुन्हा एकदा सातार्‍यात शासकीय विश्रामगृहावर पहायला मिळाली. जिल्ह्यातील हे दोन्ही मातब्बर नेते शासकीय विश्रामगृहावर समोरासमोर आल्याने काही काळ तणावसद‍ृश वातावरण निर्माण झाले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पोलिसांचीही चांगलीच तंतरली. 

गेल्या काही दिवसांपासून ना. रामराजे ना. निंबाळकर व खा. उदयनराजे भोसले यांच्यात वारंवार खटकाखटकी होत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. दीड महिन्यांपूर्वी शासकीय विश्रामधामावर दोन्ही राजे एकाचवेळी आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन अनुचित प्रकार घडू दिला नव्हता. त्यानंतर गेली दीड महिना दोघे एकमेकावर शरसंधान करत आहेत. त्यामुळे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर येणार असतील तर मोठा फौजफाटा  तेथे तैनात केला जातो. रविवारी त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.  अनपेक्षितपणे दोन्ही राजे शासकीय विश्रामधामावर आले.  ना. रामराजे  दुपारी 1 नंबरच्या सुटमध्ये बसले होते.

त्यादरम्यान खा. उदयनराजे शासकीय विश्रामगृहाकडे येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यानुसार   ते  आलेही. गाडीतून उतरताच शासकीय विश्रामगृहात एकच तारांबळ उडाली. खा. उदयनराजे येताच  सातारा पोलिस अलर्ट झाले होते.  आता काय वादावादी होणार का? असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. मात्र, शासकीय विश्रामधामावर आलेले खा. उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह सुट नं. 2 मध्ये गेले. पोलिसांनी गेल्यावेळी प्रमाणे सुट नंबर 1 ला आतून कुलूप लावून घेतले आणि तिकडे कोणी जाणार नाही याची काळजी घेतली. खा. उदयनराजे आपल्या सूटमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करीत बसले. त्यानंतर काही वेळाने ना. रामराजे आणि त्यांचे कार्यकर्ते तेथून पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. याचदरम्यान उदयनराजे यांच्या समर्थकांनी सर्किट हाऊस येथे मोठी गर्दी केल्याने तणावात भर पडली होती. मात्र, त्यानंतर सर्व वातावरण निवळले व पोलिसांनीही सुस्कारा टाकला. 

या दोन्ही मातब्बर नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. सावज टप्प्यात आल्यानंतर मी बाण मारणार आणि खा. उदयनराजे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशा प्रकारची वक्‍तव्ये करुन ना. रामराजे यांनी खळबळ उडवून दिली होती. या वक्‍तव्यानंतर नुकतेच खा. उदयनराजे यांनी फलटण येथे जावून ना. रामराजे यांच्या विरोधात वक्‍तव्य केले होते. त्यामुळे दोन्ही राजांमधील तणाव वाढला आहे. हे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर आले तर संघर्ष विकोपाला जावू शकतो हे ओळखून पोलिस नेहमी सज्ज असतात. रविवारी मात्र अनपेक्षितपणे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामवर आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.