कोरेगाव : प्रतिनीधी
कोरेगाव ते रहिमतपूर रस्त्यावर वेलंग स्मशानभूमीनजीक गुरुवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक भगदाड पडले. तीन फुट रुंद व आठ फुट खोल खड्डा पडला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने खबरदारीचे उपाय योजले. दोन्ही बाजूला मुरूम टाकून तात्पुरता एकेरी मार्ग करून वाहतूक सुरळीत केली.
कोरेगाव - रहिमतपूरमार्गे कोरेगावकडे डबलसीट जाणार्या दुचाकीस्वाराच्या समोरच खड्डा पडल्याने त्याची चांगलीच तंतरली. त्याने प्रसंगावधान दाखवत घटनेची माहिती अन्य चालकांना व स्थानिकांना दिली.
रस्त्यावरुन दररोज होणार्या अवजड वाहनांच्या वर्दळीने मोठ्या दुर्घटनेची संभावना लक्षात घेवून सतर्क नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांना दिली. प्रांताधिकारी श्रीमती नलवडे यांनी कोरेगाव सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एम.डी. पाटील यांना ही माहिती दिली. त्यामुळे उपअभियंता एम.डी. पाटील यांच्यासह बांधकाम विभागाच्यावतीने घटनास्थळी पाहणी केली. खड्डा पडलेल्या संबंधित ठिकाणी आठ ते दहा फुट पूर्ण जमीनच खचल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून खड्ड्याच्या दोन्ही बाजूला मुरूम व झाडांच्या फांद्या टाकण्यात आल्या असून उद्या जेसीबीच्या सहाय्याने बाधीत ठिकाणी उत्खनन करून कायम स्वरुपी मजबूतीकरण करण्यात येणार असल्याचे उपआभियंता पाटील यांनी सांगितले.