Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Satara › तुमचा होतो खेळ आमचा जातो जीव

तुमचा होतो खेळ आमचा जातो जीव

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 8:13PM

बुकमार्क करा
खेड : अजय कदम

मकर संक्रांतीपासून लहान मुलांना रंगीबेरंगी पतंग उंच आकाशी उडवण्याचे वेध लागतात. पतंग उडवणे हा मुलांसाठी आनंद देणारा क्षण ठरत असला तरी या पतंगाने अनेक दुर्घटना घडून काहींना तर जीव गमवावा लागल्याची उदाहरणेही आहेत. शिवाय या पतंगामुळे पक्षांच्याही आयुष्यावर ‘संक्रांत’ येत आहे. पतंगाचा मांजा अडकून वर्षभरात शेकडोहून अधिक पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी व पक्ष्यांचे जीवन वाचवण्यासाठी पतंग उडवताना नायलॉन आणि काचेचा चुरा लावलेला मांजा वापरू नये, असे आवाहन पक्षी प्रेमी करत आहेत. 

पतंग उंच आकाशी उडवण्यासाठी लहान मुलांपासून युवकांपर्यंत चुरस लागलेली असते. मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर उन्हाळ्यापर्यंत पतंग महोत्सव भरवले जातात. तसेच गल्लोगल्ली मुले पतंग उडवत असतात, पतंग उडवण्यासाठी त्याला नायलॉनचा मांजा वापरला जातो. तसेच इतरांचे पतंग काटण्यासाठी धाग्याला काचेचा चुरा लावला जातो. मात्र झाडाझुडुपांत, तारांमध्ये अडकल्यानंतर तो मांजाही तसाच अडकून पडतो. त्याचा त्रास पक्षांना होत असतो. पाय, पंख, मान अडकून पक्ष्यांचा जीव धोक्यात येण्याच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत.

असे जखमी पक्षी  पक्षीप्रेमींना सापडले तर त्यांच्यावर उपचार करून सोडून देत असतात ; परंतु अनेकदा हे पक्षी आढळून येत नसल्याने त्यांना जीवास मुकावे लागते. यातील काहीच पक्ष्यांवर वन विभागाच्या कार्यालयात उपचार होतात ; परंतु अनेक पक्ष्यांचा उपचाराविना बळी जात असतो. एवढेच नव्हे तर हा मांजा जीवघेणाही ठरत आहे. अनेक अपघातही घडले आहेत. 
त्यामुळे पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरण्याचे टाळून साध्या धाग्याचा मांजा वापरल्यास अशा दुर्घटना टाळता येणे शक्य आहे.