Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Satara › हिरवे मराठी शाळेच्या चौकशीचे आदेश

हिरवे मराठी शाळेच्या चौकशीचे आदेश

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 10:55PMखेड : वार्ताहर

शैक्षणिक नियमावली धाब्यावर बसवून जागा नसतानाही शासन धोरणाच्या विसंगत कार्यपद्धती सुरु ठेवत प्रवेश प्रक्रियेतून शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावलेल्या गोडोलीतील अंशत: अनुदानित कै. रा. स. हिरवे मराठी प्राथमिक शाळेच्या चौकशीचे  आदेश जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी दिले असून दोन विस्तार अधिकार्‍यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अंगणवाडी ते माध्यमिक शिक्षण देत असलेली हिरवे मराठी शाळा गेली 10 वर्षांहून अधिककाळ गोडोलीतील साई मंदिराच्या परिसरात भाडेतत्वावर सुरु आहे. शाळेचा भाडे करार संपल्यानंतर संबंधित जागा मालकाने थकीत असलेले भाडे मिळावे तसेच संबंधित शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरु शकते. या कारणास्तव शाळेचे साहित्य बाहेर काढायला लावले. जागेचा पत्ता नसतानाही शाळेने नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु ठेवली तर दुसरीकडे जागा घेतली असल्याचे पालकांना सांगून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावले असता परिसरातील नागरिक व पालकांनी दै. ‘पुढारी’कडे धाव घेतली. दै. ‘पुढारी’ने दि. 24 मेच्या अंकात ‘जागेचा पत्ता नाही; प्रवेश प्रक्रिया सुरु, गोडोलीतील हिरवे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गांधारीच्या भूमिकेत असलेल्या जि.प.च्या शिक्षण विभागात खळबळ उडाली. जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन तत्काळ अहवाल सादर करण्याचे फर्मान काढले. दोन विस्तार अधिकार्‍यांमार्फत शाळेची पाहणी करुन अहवाल सादर केला जाणार आहे. अंतिम निर्णय काय घेतला जाणार याच्या प्रतीक्षेत पालक व विद्यार्थी असून एक - दोन दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

या शाळेत मोलमजुरी करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी  शिकत असून शैक्षणिक नियमावलीला अनुसरुन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण विभागाने योग्य निर्णय घ्यावा. अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष न करता शासन धोरणाच्या विसंगत काम सुरु असल्यास शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.