Wed, Apr 24, 2019 22:11होमपेज › Satara › शिवार गजबजला..शेतकरी हसला..

शिवार गजबजला..शेतकरी हसला..

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 8:46PMमसूर : दिलीप माने

दमदार पावसामुळे खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. मात्र, गेल्या पंधरवड्यात दोन वेळा वळीव पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसू लागले आहे.  शेतकरी  शेतीकामात मग्‍न असल्याने शिवार गजबजून गेला आहे. 

गेल्या पंधरवड्यात मसूर पूर्व भागासह तालुक्यात सर्वत्र वळीव पाऊस  झाला. त्यामुळे शेतकरी खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या कामात गुुंतला असल्याचे दिसून येत आहे. मे महिना संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. शेती मशागतीची कामे खोळंबली होती. बळीराजा वळिवाची आतुरतेने वाट पहात बसला होता. गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने टंचाईग्रस्त गावातील काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला. खरीपपूर्व मशागती वळीव पावसाच्या आगमनावर अवलंबून असतात. झालेल्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कराड उत्तर भागात नांगरट, कुळवट, शेतात शेणखत टाकणे,  कुळवाच्या पाळ्या, फणपाळ्या देणे आदी कामे हातघाईवर आली आहेत. 

सध्या यांत्रिक शेतीवर भर असला तरी ग्रामीण भागात पारंपरिक शेतीवर शेतकर्‍यांचा भर असतो. त्यामुळे शेती औजारे खरेदी करणे व जुनी नादुरूस्त औजारे दुरूस्त करणे ही कामेही शेतात सुरू आहेत.   सर्वच शेतकर्‍यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करणे परवडत नसल्याने ते बैलांच्या सहाय्याने, पै-पाहुण्यांच्या मदतीने शेतीची मशागत करताना दिसत आहेत. अलिकडच्या काळात बैलगाडीने उकिरड्यांवरचे शेणखत ओढण्याचे प्रकार दुर्मीळ होत चालल्याने शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीने शेणखत ओढत आहेत. 

खरेदी-विक्री संघ किंवा काही कृषी संस्थांमार्फत शेतकर्‍यांना बी-बियाणे पुरविले जाते. संकरीत ज्वारी, भूईमुगाचे कोणते बियाणे पेरण्यासाठी घ्यावयाचे याचे नियोजन शेतकर्‍यांकडून सुरू आहे. खरीप मशागतीशिवाय भूईमुगाचे बियाणे शेतकरी खरेदी करत आहेत. याशिवाय हायब्रीड, सोयाबीन, घेवडा, चवळी, मूग, उडीद, वाटाणा, धना, तूर, पावटा, 
मका, आरगड, पांढरफळी यासारख्या खरीप पिकांचे बियाणे एकत्रित करण्यात शेतकरी मग्‍न झाला आहे. कराड उत्‍तरमधील काही गावात भात पीक घेतले जाते. त्याच्या लागणीसाठी रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच कराड उत्‍तरेचा भाग ऊस पीक घेण्यात अग्रेसर असल्याने आडसाली लागणीसाठी शेत तयार होवू लागली आहेत. मान्सूनच्या पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदून गेला असून खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. 

पेरणी व टोकणीच्या कामांना गती 

मागील आठवड्यात झालेल्या पावसाने कराड तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी व टोकणीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शिवार शेतकर्‍यांनी फुलल्याचे दिसून येत आहे. शेतात जमिनीची मशागत करून पेरणी, टोकणीच्या कामांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे.      

कराड तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी होवून पावसाच्या हालक्या सरी कोसळत आहेत. उन्हाळी पावसानंतर सध्या खरीप पेरणीसाठी उपयुक्‍त असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. काही दिवसापुर्वी दमदार पाऊसही झाला. पावसाने समाधानकारक सुरूवात केल्याने शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला प्रारंभ केला. अनेक शेतकर्‍यांनी सरी सोडुन टोकणीला प्रारंभ केला. सतत पडणारा पाऊस उघडला नाही तर पेरणी उशिरा होईल या भीतीने शेतकर्‍यांनी पेरणी सुरू केली. या पावसावर तालुक्यात पंचवीस टक्के पर्यंत पेरण्या झाल्या आहेत. तर भर पावसात सरी  सोडलेल्या शेतात टोकणीची कामे सुुरू आहेत.  

तालुक्यात विशेषत: डोंगरी भागात पेरणी,टोकणीची कामे हातघाईवर आली असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर जे शेतकरी पेरणी करणार होते, त्यांनी पेरणीची कामे थांबवली आहेत. सध्या शेतकरी  पावसाच्या प्रतिक्षेत आहे. कराड दक्षिणच्या डोंगरी भागात धुळवाफ भात पेरणी पूर्ण झाली दोन दिवस पडत असलेल्या पावसाने भाताची उगवण चांगली झाली आहे.