Thu, Jul 18, 2019 21:40होमपेज › Satara › खंडाळा तहसीलदारांची गाडी फोडली

खंडाळा तहसीलदारांची गाडी फोडली

Published On: Apr 19 2018 10:21PM | Last Updated: Apr 19 2018 10:51PMखंडाळा : वार्ताहर

खंडाळा तालुक्याचे तहसीलदार विवेक जाधव यांची विश्रामागृहानजीक उभ्या केलेल्या खासगी कारची अज्ञाताने गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास तोडफोड केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खंडाळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गौण खनिज वाहतुकीवरील कारवाई रोखण्यासाठी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्‍त होत असून तशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. 

याबाबत माहिती अशी, खंडाळा तालुक्यात अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाई करणारे खंडाळ्याचे धडाकेबाज तहसीलदार विवेक जाधव यांची खासगी कार अज्ञातांनी फोडल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस  आला. तहसीलदार विवेक जाधव एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी खंडाळा येथील विश्रामगृहावर त्यांची खासगी कार  (एमएच 12 जीआर 3873) पार्क केली होती. त्यांनतर  रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान अज्ञाताने गाडीवर दगडे मारून गाडीच्या दरवाजाच्या काचा फोडल्या व तेथून तो पसार झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तहसीलदार यांचीच कार फोडल्याने परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. 

खंडाळा तालुक्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी सुमारे दहा महिन्यांपूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली. तालुक्यात बेसुमार होणारी वाळू वाहतूक व गौण खनिज उत्खनन करणार्‍यांविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशानुसार धडक कारवाई करून लाखो रुपयांचा महसूल बुडवणार्‍यांना वठणीवर आणले. त्याचा राग मनात धरून अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दरम्यान, महसूल विभागाातील अधिकार्‍याच्या गाडीला लक्ष्य केल्याने जिल्हा महसूल विभागात खळबळ उडाली आहे. खंडाळा पोलिसांसमोर या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान समोर उभे राहिले आहे.