Sat, Aug 24, 2019 00:13होमपेज › Satara › ‘एस’ वळणाचे पाप बांधकाम विभागाच्या माथी

‘एस’ वळणाचे पाप बांधकाम विभागाच्या माथी

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:41PMखंडाळा : प्रतिनिधी

पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगद्यानजीक असणारे जीवघेणे ‘एस’ वळण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सने निर्माण केले नाही, तर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने निर्माण केले आहे. आम्ही येथे होणार्‍या अपघातांची जबाबदारी कशी घेणार, असे सांगत प्राधिकरणाच्या पोतदार या अधिकार्‍याने  अकलेचे तारे तोडत जबाबदारी झटकली. दरम्यान, ‘एस’ वळणावरील अपघातग्रस्त घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाने कोणत्याही ठोस उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टीची कामे सुचवली. त्यामुळे एस वळणावरील मृत्युचा फास कायम राहणार असल्याचे निश्‍चित होत आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावर असणार्‍या खंबाटकी बोगद्यानजीकच्या एस आकाराच्या वळणावर झालेल्या शेकडो अपघातामध्ये सुमारे 76 जणांचा मृत्यु झाला आहे तर शेकडो लोक कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. त्यामुळे हे वळण कायमस्वरुपी काढण्याच्या मागणीने तालुकावासीय, वाहनधारक व प्रवांशानी मागणी केली आहे. यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान,  मोठा अपघात झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी, महामार्गाचे सुरक्षा सल्लागार यांचे दौरे व पाहणी हे नित्याचे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी विजापूरहून भोरला मजूर घेवून निघालेला आयशर टेम्पो महामार्गावरील खंबाटकी बोगद्यानजीक एस कॉर्नरवर पहाटे पलटी होवून 18 मजुरांवर काळाने घाला घातला. 19 जण जखमी झाले.

या घटनेनंतर रस्ते प्राधिकरणाचे नवी दिल्ली येथून निघालेले पथक अपघातस्थळी दाखल झाले. पथकाने अपघात कसा झाला? एस वळणावर उपाययोजना काय? यावर प्राथमिक चर्चा केली. परंतु, या गंभीर समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना न सुचवता तात्पुरत्या मलमपट्टीची कामे करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे सध्या तरी हे वळण काढून सरळ रस्ता होणार नसल्याचे निश्‍चित झाले असून एस कॉर्नरवरील मृत्यूचा फास वाहनधारकांच्या मानेभोवती कायम राहणार आहे. यावेळी प्रोफेसर सिंकदर, श्री जकप, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पोतदार, तहसीलदार विवेक जाधव, स.पो.नि. युवराज हांडे, रिलायन्सचे बी. के. सिंग, जे. के. मिश्रा  आदी उपस्थित होते.

महामार्ग प्राधिकरणाने तोडले अकलेचे तारे...

दररोज हजारो वाहनांची वाहतूक सुरू असते. जर हे वळणच चुकीच्या पद्धतीने बांधले गेले आहे असे समजतात, तर मग सर्वच गाड्यांचा अपघात का होत नाही, असा उलटा सवाल पोतदार या अधिकार्‍याने केला. महामार्ग प्राधिकरणाने अशा पद्धतीने अकलेचे तारे तोडल्याने संताप व्यक्‍त करण्यात आला. मात्र, होणारे अपघात गंभीर असून यावर उपाययोजना करून होणारे मृत्यूचे तांडव थांबवा, अशा सूचना तहसीलदार जाधव व उपस्थित पोलिस प्रशासनाने केल्या.

 

Tags ; Khandala, Khandala news, accident, construction department,