होमपेज › Satara › महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संतांच्या विचारात : श्रीपाल सबनीस 

महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संतांच्या विचारात : श्रीपाल सबनीस 

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:53PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्रात काही लोकांकडून जातीय भिंती उभ्या करून समाजामध्ये  फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला एकसंघ ठेकण्याचे सामर्थ्य संत परंपरेतील विचारात असून ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गुंफण अकादमी व यशवंतराव चव्हाण विचार मंचतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन व गुंफण गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल,  मिलिंद जोशी,  बबन पोतदार, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, मसूर सरपंच सुनीता मसूरकर यांची उपस्थिती होती.

यावेळी प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘आम्ही जिंकिला संसार’ व डॉ. बसवेश्‍वर चेणगे लिखित ‘प्रश्‍नवेध’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य शहा यांचा 85 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी, सिध्देश्‍वर पुस्तके,  कल्याण कांबिरे, नेहा शहा व गेवराई (जि. बीड) येथील वक्‍ते रामानंद तपासे यांना गुंफण गुणगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, आजच्या व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास झालेली अलोट गर्दी आश्‍चर्यचकित करणारी आहे. यावेळी मिलिंद जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, सीए दिलीप गुरव, नेहा शहा यांनी मनोगत व्यक्‍त केले. चंद्रकांत कांबिरे यांचा न्यायालय अधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने संचालक प्रकाश बडेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक गुंफण अकादमीचे अध्यक्ष बसवेश्‍वर चेणगे यांनी केले. नितीन शहा यांनी स्वागत, तर चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचलन केले. सुजीत शेख यांनी आभार मानले.

...हे तर सरकारच्या कार्यशून्यतेचे उदाहरण !

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांच्यासारख्या विवेकवादी लोकांची हत्या करून महाराष्ट्रातील विवेक संपविण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. केवळ त्यांचे मारेकरी पकडून हा प्रश्‍न संपणार नाही, तर हा प्रश्‍न सोडविण्यासाठी या हत्याकांडामागचा मास्टर माईंड पकडणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. सबनीस या कार्यक्रमात म्हणाले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांना गुन्ह्याचा जो उलगडा झाला तो महाराष्ट्रातील पोलिसांना का झाला नाही असा सवाल करून, कर्नाटक पोलिसांच्या तपासावरून डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडावे लागते, हे पोलिस व महाराष्ट्र सरकारच्या कार्यशून्यतेचे उदाहरण आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.