Wed, May 27, 2020 07:21होमपेज › Satara › शांततेची परंपरा अबाधित ठेवा : खा.पाटील

शांततेची परंपरा अबाधित ठेवा : खा.पाटील

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
सातारा : प्रतिनिधी

ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला सामाजिक ऐक्याची आणि शांततेची परंपरा आहे. ती आयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मीडियावर व्यक्त न होता त्यातूनच अबाधित राहिली आहे. हा एकोपा कायम राहू द्यात, असे आवाहन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

अलंकार हॉल येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, सहाय्य्क पोलिस उपअधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे उपस्थित होते.

खा. पाटील पुढे म्हणाले, अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सातारकरांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निकाल येण्यापूर्वी व निकाल आल्यानंतर कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येवू नये, याची काळजी घ्यावी. हिंदू, मुस्लिम, शीख-इसाई आपण सर्व बांधव आहोत. आपण प्रत्येक कामासाठी एकमेकांची मदत घेत असतो. आपल्या सातारा जिल्ह्याला छत्रपतींच्या गादीचा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुरोगामी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा आहे. त्यामुळे आपण शांततेने वागून सर्वधर्म समभाव जपावा, असेही ते म्हणाले.
खा. निंबाळकर  म्हणाले,  या जिल्ह्यात चुकीच्या प्रवृत्तींना थारा मिळणार नाही. अयोध्या निकालप्रकरणी पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर चांगल्याप्रकारे अंकुश ठेवला आहे. निकालानंतर जातीय तेढ निर्माण होईल असे वागू नये. 

जिल्हाधिकारी श्वेेता सिंघल म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाने निकालानंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोेशल मीडियावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. यात तरूणाईने मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी. सातार्‍याचा गर्व आणि अभिमान कायम ठेवावा.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या, अयोध्येचा निकाल हा 160 वर्षांनी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मीडियावर व्हायरल न करता तत्काळ जवळच्या पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आहे, त्यामुळे त्याचा आदर राखणे गरजेचे आहे. सातार्‍यातील सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच परंपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी सहाय्य्क पोलीस उपअधीक्षक समीर शेख यांनी आभार मानले.

माझ्या दोन्ही मुलींचा मान राखा...
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, माझ्या बोलण्यापूर्वी माझ्या दोन मुलींप्रमाणे असलेल्या श्वेता आणि तेजस्वी यांनी तुम्हाला या अयोध्या निकालानंतर जिल्ह्यात शांतता राखावी, अशी ओवाळणी मागितली आहे. त्यामुळे तुम्ही ती राखीपौर्णिमा आणि भाऊबीजची ओवाळणी समजून द्यावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.