Tue, Apr 23, 2019 20:09होमपेज › Satara › निगडी येथे १२ मोटेचा इतिहासकालीन ठेवा 

निगडी येथे १२ मोटेचा इतिहासकालीन ठेवा 

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 28 2018 8:02PMमसूर : दिलीप माने

निगडी (ता. कराड) येथील 12 मोटेचे शिवकालीन तळे त्याकाळी खूप प्रसिद्ध होते. पण सध्या भग्‍नावशेष रूपातील इतिहासाचा हा अनमोल ठेवा पाहता तो जतन करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांसह अनेक इतिहासप्रेमींनी व्यक्‍त केले आहे.

या इतिहासाच्या साक्षीदाराचे वर्णन व आख्यायिका कथन करताना काही वयोवृद्ध व जाणकार व्यक्‍तींनी सांगितले की,  श्रीमंत महादेवराव शिंदे यांचे चिटणीस येथे वास्तव्यास होते. त्यांच्याच मालकीच्या जागेत हे 12 मोटेचे तळे असून आज त्याची खूप दयनीय अवस्था झाली आहे. पण आजही या तळ्यात तीन कोपर्‍यात मुबलक पाणीसाठी आहे. अतिशय स्वच्छ हिरवेगार असे भरपूर पाणी सध्या येथे पहावयास मिळत आहे. तळ्याच्या मधोमध मातीचा ढिगारा साठला असून तो हटविल्यास आणखी पाणीसाठा वाढू शकतो. चिटणीसांच्या मालकीच्या सुमारे एक एकर जागेत, घडीव पाषाणापासून तयार करण्यात आलेला इतिहासकालीन हा अनमोल ठेवा आज भग्‍नावशेष स्वरूपात दिसत आहे. येथे चिटणीसांचे हत्ती, घोडे, बैल व इतर शेकडो पाळीव जनावरे याठिकाणी पाणी पिण्यासाठी येत. त्यांना उतरण्यासाठी घडीव पाषाणापासून पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. शेतीसाठीही याच तळ्याच्या पाण्याचा वापर केला जात असे. या तळ्याच्या वरील बाजूस 6 ठिकाणी मोटा आहेत. प्रत्येक मोटेवरून दोन बैलजोड्यांच्या सहाय्याने तळयातून शेतीसाठी पाणीउपसा केला जाई. त्यामुळे ‘बारा मोटेचे तळे’ असे त्याचे 

नामकरण पडले आहे. विशेष म्हणजे या तळ्याच्या खालून मोरीचे पाणी आत येण्याची सोय असल्याचेही समजते. तसेच तळयाच्या शेजारून जाणा-या ओढयातून पाणी तळ्यात सोडले तर बारमाही पाणी टिकून राहून त्याचा पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होईल, असे मत जाणकारांनी व्यक्‍त केले आहे. सध्या या तळ्याचे व येथील दोन इतिहासकालीन वाड्यांचे मालक श्रीमंत शिंदे यांचे चिटणीस सध्या ग्वाल्हेर व उज्जैन येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी हे तळे गावास दान करावे, अशी येथील जनतेची मागणी आहे. 

लोकप्रतिनिधींनी हा नामशेष होत चाललेला अनमोल ठेवा जतन होण्यासाठी प्रयत्न करावेत व त्याची डागडुजी करून इतिहासप्रेमींसाठी हा खजिना खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे.