Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Satara › पाटण प्रकल्पग्रस्तांचा तालुका आहे याचे भान ठेवा : भारत पाटणकर

पाटण प्रकल्पग्रस्तांचा तालुका आहे याचे भान ठेवा : भारत पाटणकर

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:11PMपाटण : प्रतिनिधी

माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा पाटण तालुका अर्धा प्रकल्पग्रस्तांचा आहे आणि हे सर्व श्रमिक मुक्ती दलाशी एकनिष्ठ आहेत, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवावे, असा सल्ला श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. 

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मुंबईमधील चाकरमान्यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्‍वर, कोरेगाव आणि कराड तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा मेळावा आयोजित केला होता. कोयना प्रकल्पग्रस्तांना मिळालेले यश हे डॉ. भारत पाटणकर यांच्या चतुर रणनीतीमुळे व कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या ताकदीवर मिळाले आहे असे प्रकल्पग्रस्त म्हणाले. 

पाटण तालुक्यातील कोणीही लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. कोयनेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा अशी कोयनेतील जनतेने डॉ. भारत पाटणकर यांना विनंती केली होती त्यानुसार त्यांनी हे आंदोलन करून ते यशस्वी केले.प्रकल्पग्रस्तांच्या समस्या या 64 वर्ष सोडविल्या नाहीत आणि आता श्रेय घ्यायला जर कोण येत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रकल्पग्रस्तांनी ठणकावून सांगितले.

डॉ.पाटणकर म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांचा हा विजय आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवला त्यामुळेच हे शक्य झाले. आपली निष्क्रियता लपविण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या एकीत फूट पडण्याचा प्रयत्न कोणी करू नये.यावेळी पाटण तालुक्यातील हरिशचंद्र दळव,  बाजीराव कदम, संदीप कदम, संजय कदम, राजू मोरे,  अजय पाटील, शलाका पाटणकर , दत्ता देशमुख, चैतन्य दळवी, श्रीपती माने, विठ्ठल सपकाळ  तसेच जावळी, महाबळेश्‍वर, कोरेगाव, कराड तालुक्यातील मुंबईस्थित हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

..तर लोकवर्गणीतून कामे करू

आंदोलनात सहभागी प्रकल्पग्रस्तांची लोकप्रतिनिधींच्या फंडातून मंजूर  कामे थांबविली जातील, असे आंदोलनास विरोध करणार्‍यांकडून बोलले जात आहे. त्यावर पुनर्वसन फंड प्रकल्पग्रस्तांसाठी असतो. नाहीतर प्रकल्पग्रस्त लोकवर्गणी काढून कामे करतील, असे प्रकल्पग्रस्त म्हणाले. 

 

Tags : satara, Patan, Patan news, project affected, Bharat Patankar,