Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Satara › दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबची रॅली दणक्यात 

दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबची रॅली दणक्यात 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात  दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी  क्लबची रॅलीदणक्यात निघाली.  या रॅलीस कस्तुरी क्लबच्या महिला व युवती सभासदांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, या रॅलीतील सहभागी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी  क्लबच्या नवीन वर्षातील सभासद नोंदणीला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्यावतीने    सभासद महिला व युवतींसाठी नेहमीच  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.  त्याच अनुषंगाने महिला दिनाचे औचित्य साधत या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने कस्तुरी  क्लबच्या महिलांना दुचाकी चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले होते.  या प्रशिक्षीत झालेल्या महिलांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी ही रॅली पार पडली. रविवारी सकाळी 9 वा. सभासद महिलांच्या हस्ते पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. श्रीफळ वाढवून  या भव्य रॅलीस सुरुवात झाली. कस्तुरी सभासदांच्या या रॅलीच्या अग्रभागी वर्षा साळुंखे यांचे स्त्रीशक्ती ढोल -ताशा  निशाना पथक होते.  रॅली कमानी हौद, देवी चौक या मार्गावरुन मोती चौकापर्यंत  काढण्यात आली. यावेळी  कस्तुरी क्लबच्या महिला सभासद, युवती या रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. 

नऊवार साडी, नथ अशा पारंपारिक वेशभूषेत ढोल-ताशा पथकातील महिलांनी भगवे फेटे बांधले होते. या पथकापुढे लावण्यात आलेला कस्तुरी क्लबचा लोगो  उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.  ढोल-ताशांच्या निनादात ही रॅली जात असताना नागरिकांनीही जागोजागी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.   ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. गर्दीतले अनेकजण ही रॅली आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात  शूट करत होेते.

रॅली राजपथ, दै. पुढारी कार्यालय, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती  चौकात  पोहोचल्यावर ढोलताशा पथकाने ढोलवादन सादर केले. सहभागी असलेल्या ढोल ताशा निशाना पथकाने आकर्षक सादरीकरण केले. अनेकजण ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण  थांबून पाहत  होते.   चौकात नागरिकांनी  प्रचंड गर्दी केली होती.  त्यानंतर   चॅम्पियन अ‍ॅकॅडमीच्या तमन्ना  रिनवा यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. प्रवासात, रस्त्याने येता-जाता मुलींची महिलांची छेड काढण्याच्या घटनांना आळा घालणार्‍या काही क्लृप्त्याही शिकवल्या. कस्तुरी सभासद महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत महिला सबलीकरणाची शपथ घेतली.