Wed, Apr 24, 2019 01:54होमपेज › Satara › कासचा हंगाम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार? 

कासचा हंगाम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार? 

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 10:51PMबामणोली : निलेश शिंदे 

जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारावरील हंगाम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव वनविभाग व समितीच्या विचाराधीन  आहे. त्याअनुषंगाने सज्जता झाली असून फुले उमलण्यासही सुरूवात झाली आहे. दरम्यान, फुलांचे गालिचे तयार होण्यास अजूनही अवधी असला तरी हंगाम मात्र सुरू होणार असल्याचे चित्र आहे. 

सातारचे नूतन उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा यांच्या उपस्थितीत कास वनव्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असून फुले उमलायला सुरुवात झाली आहे. मात्र फुलांचा गालिचा तयार होण्यास काही दिवसांचा कालावधी जाणार आहे. यावर्षी येणार्‍या पर्यटकांची पार्किंग व्यवस्थाही घाटाई फाटा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणाहून बस मधून पर्यटकांना पठारावर ने -आण केली जाणार आहे. याकरता प्रति प्रवासी दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.

यावर्षीपासून सर्वत्र वॉकीटॉकी वरून संवाद साधला जाणार आहे.प्रवेश शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसून प्रत्येक व्यक्तीला प्रवेश शुल्क शंभर रुपये, बारा वर्षाखालील पर्यटकांना व जेष्ठ नागरिकांना सवलत दिली जाणार आहे. अभ्यास दौर्‍यातील विध्यार्थ्यांना वीस रुपये शुल्क आकारले जातेल. मात्र संबंधित विभागाचे पत्र आवश्यक आहे. स्वछतागृह व पिण्याचे पाणी याची पठार परिसरात ठिक ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.

या बैठकीला सातारचे वनविभागाचे अधिकारी परळकर, शितल राठोड, जावलीचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल रंगराव सावंत, वनपाल श्रीरंग शिंदे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.