Sun, Apr 21, 2019 04:25होमपेज › Satara › कास झाले भकास; वणव्यात पठार होरपळले

कास झाले भकास; वणव्यात पठार होरपळले

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:46PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

कास पुष्प पठारामुळे पर्यटनाच्या जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा नावलौकीक झाला आहे.  परंतु, याची काहीच कदर नसलेल्या समाजकंटकांकडून याठिकाणी चक्क वणवा पेटवला जात आहे. यामुळे अत्यंत दुर्मिळ अशा वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्‍चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. कास पुष्प पठारावर पश्‍चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये औषधी वनस्पती तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती आढळून येतात. अशा या अनमोल नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्यासाठी वनविभाग, पर्यावरण रक्षक प्रयत्नशील आहेत.

मात्र, काही समाजकंटक यामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत. मंगळवारी काही समाजकंटकांनी कास पठाराला वणवा लावला. यामुळे लागलेल्या पठारावरील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे पठार काळेकुट्ट झाले होते. वनसंरक्षक समित्यांमार्फत दररोज या परिसरात बंदोबस्त असला तरीही ही घटना घडल्याने पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. 

दरम्यान, या घटनेबाबत काय कारवाई केली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वन विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर व मेढ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.